ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आता 87 वर्षांचे झाले आहेत. पण वयाची 85 शी ओलांडल्यानंतरही धर्मेंद्र आजही तितकेच उत्साही असतात. आजही आपल्या अभिनयाने ते चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या वय वाढलं असल्याने त्यांच्या चित्रपटांची संख्या कमी झाली आहे. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची कमाल दाखवली होती. धर्मेंद्र हे अभिनेत्यासह एक शायरही आहेत. अनेकदा ते एक्सवर आपल्या चाहत्यांसह शायरी शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शायरीच्या माध्यमातून त्यांनी आपली स्थिती सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मेंद्र हे सध्या आपला जास्तीत जास्त वेळ फार्म हाऊसवर घालवत आहेत. तिथे कधी ते गाडी चालवताना दिसतात, तर कधी शेती करताना दिसतात. अनेकदा ते फार्म हाऊसमधील कर्मचाऱ्यांसह शेतीमध्ये रमलेले असतात. आपले व्हिडीओही ते अनेकदा शेअर करतात. यासह ते वर्कआऊटवरही जोर देतात. काही वेळा इच्छा झाली तर ते आपल्या चित्रपटांचे किस्से सांगणारा एखादा व्हिडीओही शेअर करत असतात. 


शायरीच्या माध्यमातून सांगितली स्थिती


धर्मेंद्र यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते शायरी करताना दिसत आहेत. व्हिडीओत ते बोलतात की, 'तो सुनिए जनाब मैं क्या लिखता हूं...आंखें रंग नहीं पहचानतीं, कहता है ले चल चमन में। कोई समझाए दिल-ए-नादान को, अब तो पैरों में भी दम नहीं है।'. 


हा व्हिडीओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ऐ हकीकत-ए-जिंदगी, मैं जवान हूं अभी।'



अमेरिकेतून परतले आहेत धर्मेंद्र


काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती बरी नसल्याचं वृत्त आलं होतं. धर्मेंद्र यांच्यावर उपचार करण्यासाठी सनी देओल त्यांना घेऊन अमेरिकेला गेल्याची चर्चा होती. पण नंतर कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसंबंधीच्या चर्चा चुकीच्या असल्याचं सांगत वृत्त फेटाळलं होतं. धर्मेंद्र यांची प्रकृती चांगली असल्याचं कुटुंबाने स्पष्ट केलं होतं. धर्मेंद्र काही दिवसांपूर्वीच पत्नी प्रकाश कौर आणि मुलगा सनी देओलसह अमेरिकेतून परतले होते.