`तू पंजाबी म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाहीस`, दिलजीतने सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद, लगेच म्हणतो `मी तर...`
`चमकीला` (Chamkeela) चित्रपटामुळे एकीकडे अभिनेता दिलजीत दोसांझचं (Diljit Dosanjh) कौतुक होत असताना दुसरीकडे त्याला पगडी काढल्याने टीकेचा सामनाही करावा लागत आहे. यादरम्यान गायक आणि रॅपर नसीबने दिलजीतच्या छोट्या केसांवरुन भाष्य करत तू पंजाबी म्हणण्याच्या लायकीच्या नाहीस असं विधान केलं.
बॉलिवूड आणि पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) 'चमकीला' (Chamkeela)चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एकीकडे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्याला टीकेचा सामनाही करावा लागत आहे. भूमिकेसाठी दिलजीतने पगडी काढल्याने त्याच्यावर पैशांसाठी काहीही करु शकतो अशी टीका होत आहे. त्यात आता त्याच्या छोट्या केसांवरुनही ट्रोल केलं जात आहे. पंजाबी रॅपर नसीब (Rapper Naseeb) याने दिलजीतवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. त्याने टीका करताना असं काही म्हटलं जे दिलजीतला अजिबात आवडलं नाही. यानंतर त्यानेही त्याला सडेतोड उत्तर दिलं.
चमकीला चित्रपटात दिलजीतने अमर सिंग चमकीला यांची भूमिका निभावली आहे. प्रसिद्ध गायक अमर सिंग चमकीला यांची वयाच्या 27 व्या वर्षी गोळ्या घालून हत्या कऱण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही ठार कऱण्यात आलं होतं. चित्रपटात दिलजीत आणि परिणीती प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान याच भूमिकेवरुन नसीबने दिलजीतवर टीका करताना वाद निर्माण केला.
नसीबने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत दिलजीतवर हल्लाबोल केला. यावेळी त्याने बरंच काही म्हटलं. दिलजीत पंजाबी म्हणण्याच्या लायकीचा नाही. त्याने आधी पगडी बांधणं शिकलं पाहिजे असं त्याने म्हटलं होतं. एका फोटोत दिलजीत छोट्या केसांमध्ये दिसला होता. त्याचा हा लूक चमकीला चित्रपटासाठी होती. पण एका मुलाखतीत त्याने आपण भूमिकेसाठी केस कापले नसून, विग घातला होता असं स्पष्टीकरण दिलं होतं.
दिलजीत दोसांझने दिलं उत्तर
नसीबच्या या पोस्टला दिलजीतनेही उत्तर दिलं. त्याने इंस्टाग्राम स्टोरीत व्यक्त होताना लिहिलं की, 'वीरे, माझ्याकडून खूप सारं प्रेम. मला आशा आहे की तुझी कारकीर्द यशाची उंची गाठेल. तू स्वतःच बोलत आहेस आणि उत्तर देत आहेस. खूप सारं प्रेम.'
दिलजीतच्या या पोस्टवर नसीबही व्यक्त झाला. दिलजीतच्या पोस्टनंतर त्याचा सूरच बदलला आणि आपण फक्त मुद्दा मांडत होतो असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्याने नंतर ही पोस्ट डिलीट केली.
कोण आहे नसीब?
नसीबचं खरे नाव बिक्रमदीप सिंग धालीवाल आहे. तो लुधियानाचा रहिवासी असून त्याचा जन्म 2 सप्टेंबर 1997 रोजी झाला. हिप-हॉप गायक आणि गीतकार म्हणून त्याने आपला ठसा उमटवला आहे. नसीबची ओल्ड स्कूल, परांदा आणि मिडनाईट MOB ही गाणी प्रसिद्ध आहेत.