मुंबई: प्रयोगशीलतेला कलेची जोड देत गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये विविध विषयांवर आधारित चित्रपट साकारले जात आहेत. याच चित्रपटांच्या यादीतील एक नाव म्हणजे 'मंटो'. उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा 'मंटो' हा चित्रपट बरेच वाद आणि चर्चांनंतर अखेर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण, त्यातही चित्रपटाच्या वाट्याला आलेली संकटं काही कमी झाली नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीव्हीआर ग्रुपच्या चित्रपटगृहांमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याचं सांगत या चित्रपटाचं प्रदर्शन पहिल्याच दिवशी काही वेळासाठी रद्द करण्यात आलं. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे अहमदाबाद, दिल्ली येथील चित्रपटगृहांमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला.  


ऐन प्रदर्शनाच्याच दिवशी एकाएकी आलेल्या या अडचणीमुळे 'मंटो'च्या दिग्दर्शिका नंदिता दास यांनीही आपली नाराजी व्यक्त करत एक ट्विट केलं. ज्यामाध्यमातून आपल्याला झाला प्रकार न रुचल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 
'Spreading #Mantoiyat will not stop' असं लिहित त्यांनी एक प्रकारे चित्रपटाच्या बाजूने आपण खंबीरपणे उभं असल्याचा दृढ निश्चयच व्यक्त केला. 



दरम्यान, नंदिताने आणि मंटो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी ज्यावेळी झाल्या प्रकाराबद्दल नाराजीचा सूर आळवला तेव्हा पीव्हीआर समूहातर्फे सर्व गोष्टी पूर्वपदावर आणत चित्रपटाचं प्रदर्शन करण्याचं आश्वासन देत काही वेळाने चित्रपटाचे शो सुरु केल्याचंही पाहायला मिळालं. 



सआदत हसन मंटो यांच्या लेखनशैलीची लोकप्रियता आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर मंटोच्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यात मध्यवर्ती भूमिका साकारत असून, रसिका दुग्गलसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहे.