Rajkumar Santoshi Cheque Bounce Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्ये घडलेल्या एका प्रकरणासाठी राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन कोटी रुपयाचा दंडही ठोठावला. जामनगर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. राजकुमार संतोषी यांचं चेक बाऊन्सचं हे प्रकरण 2015 मधील आहे. राजकुमार संतोषी यांनी जामनगरचे व्यावसायिक अशोकलाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले होते. पण त्यांनी ते पैसे परत केले नाही. त्यानंतर अशोकलाल यांनी राजकुमार संतोषी यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. 


अशोकलाल यांनी 2019 मध्ये राजकुमार संतोषी यांच्याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली. त्यावेळी अशोकलाल यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. यावेळी ते म्हणाले होते, राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे चांगले मित्र आहेत. 2015 मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले होते. यावेळी संतोषी यांनी अशोकलाल यांना 10  लाखांचे 10 चेक दिले होते. पण 2016 मध्ये हे सर्व चेक बाऊन्स झाले. या काळात अशोकलाल यांनी संतोषी यांना संपर्कही केला. पण त्यांनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही. 


याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 17 वेळा सुनावणी करण्यात आली. पण या सर्व सुनावणींना राजकुमार संतोषी हे गैरहजर राहिले. यानंतर 18 व्या सुनावणीवेळी राजकुमार संतोषी हे न्यायालयात हजर झाले. यानंतर कोर्टाने बाऊन्स झालेल्या प्रत्येक चेकसाठी 15 हजार रुपये द्यावे लागतील असे आदेश दिले होते. पण त्यानंतर आता मात्र न्यायालयाने याबद्दल कठोर निर्णय दिला आहे. या प्रकरणी राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबरोबरच त्यांना बाऊन्स झालेल्या प्रत्येक चेकच्या दुप्पट रक्कम भरावी, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहे. यानुसार हा दंड दोन कोटी रुपये इतका असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.


राजकुमार संतोषी यांनी घायल, घातक यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. राजकुमार संतोषी प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी सनी देओलसह शाहिद कपूर, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार अशा दिग्गज कलाकारांसह काम केलं आहे. त्यांनी ‘खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘दामिनी’ अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.याशिवाय ‘पुकार’, ‘लज्जा’, ‘दिल है तुम्हारा’ आणि ‘अंदाज या सिनेमांचे त्यांनी लेखन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. राजकुमार संतोषी दिग्दर्शित लाहौर 1947 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सनी देओल आणि आमिर खान हे कलाकार झळकणार आहेत.