कुटुंबातील खास व्यक्तीच्या निधनामुळं बिग बींच्या घरी दिवाळी पार्टी नाही
कोरोना नाही यामागचं कारण....
मुंबई : कलाविश्व हे ज्याप्रमाणं कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृतींसाठी ओळखलं जातं, त्याचप्रमाणं याच सेलिब्रिटी वर्तुळामध्ये विविध कारणांनी होणारे ग्रँड सेलिब्रेशनही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतं. पण यंदा मात्र चाहत्यांचा काहीसा हिरमोड होऊ शकतो. कारणही तसंच आहे.
दिवाळी आली, की सेलिब्रिटींकडून आयोजिक केल्या जाणाऱ्या पार्टी विशेष लक्षवेधी ठरतात. अशाच वातावरणात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी आयोजित होणाऱ्या पार्टीबाबतही अनेकांनाच उत्सुकता असते. पण, यंदा मात्र चित्र काहीसं वेगळं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कोविडच्या कारणामुळंच नव्हे, तर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि इतरही काही दिग्गज सेलिब्रिटींच्या निधनामुळं यंदा बिग बींच्या घरी दिवाशीचा उत्साह हा काहीसा आवरताच घेतल्याचं पाहायला मिळणार आहे.
'डेली सोप क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूर हिनंही असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी एकताकडेही दिवाळ सेलिब्रेशची रंगतच पाहायला मिळणार नाही.
ऋषी कपूर यांच्याशी बिग बींचं खास नातं...
ऋषी कपूर हे अमिताभ बच्चन यांचे फक्त फार चांगले मित्रच नसून, त्यांचे नातेवाईकही होते. बिग बींची मुलगी श्वेता बच्चन हिचा विवाह ऋषी कपूर यांचा भाचा निखिल नंदा याच्याशी झाला. त्यामुळं या नात्याच्या बंधनात ही दोन कुटुंबही अडकली. कुटुंबातील एका खास व्यक्तीच्या निधनामुळंच दिवाळीचा Diwali 2020 सण अगदीच साधेपणानं साजरा करण्याला ते प्राधान्य देताना दिसतील.