Entertainment : बॉलिवूडच्या टॉप दिग्दर्शकांमध्ये रोहित शेट्टीचं (Rohit Shetty) नाव घेतलं जातं. रोहित शेट्टी याच्या गोलमाल सीरिज (Golmal), चेन्नई एक्स्प्रेस (Chennai Express), सिंघम (Singham), सूर्यवंशी (Suryavanshi) आणि सिम्बा (Simba) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी ब्लॉक बस्टर सिनेमा घेऊन आला आहे. ख्रिसमसचं (Christmas) निमित्त साधत रोहित शेट्टीचा बिग बजेट चित्रपट सर्कस आज देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणवीस सिंह प्रमुख भूमिका साकारत असून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), पूजा हेगडे (Pooja Hegde) या को-स्टार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी कलाकारांना का संधी देतो?
रोहित शेट्टीने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. मोठमोठे होर्डिंग, जाहीरातबाजी याबरोबरच अनेक कार्यक्रमांना रोहित शेट्टीने हजेरली लावली. अशाच एका कार्यक्रमात बोलताना त्याने मराठी कलाकारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुझ्या जवळपास सर्व चित्रपटांमध्ये मराठी कलाकार पाहिला मिळतात, तुझ्या चित्रपटात तू मराठी कलाकारांना का भूमिका देतोस? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. 


रोहित शेट्टीचं मन जिंकणारं उत्तर
या प्रश्नावर रोहित शेट्टीने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली. मराठी कलाकार हे प्रचंड प्रतिभावान आहेत, विशेष म्हणजे त्यांच्यात अजिबात अहंकारी नाहीए, मराठी कलाकार कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात, त्यांची ही वृत्ती मला आवडते. शिवाय माझ्या चित्रपटांना मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 60 टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो, असं सांगत रोहित शेट्टीने मराठी कलाकारांचं कौतुक केलं.


सर्कसमध्ये मराठी कलाकार
रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर आणि अश्विनी काळसेकर या मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. याआधी सुपरहिट ठरलेल्या सिंघम चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf), सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आणि विजय पाटकर (Vijay Patker) झळकले होते. तर गोलमाल सीरिजमध्ये मराठोमोळ्या श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) मुख्य भूमिका साकारली होती. रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) सिंबा चित्रपटात सिद्धार्थ जाधवची (Siddharth Jadhav) भूमिकाही लक्ष वेधून घेणारी ठरली होती, याशिवाय या चित्रपटात वैदेही परशुरामीनेही (Vaidehi Parshurami) अभिनय साकारला होता. 


काय आहे सर्कस सिनेमाची कथा
विल्यम शेक्सपिअर यांच्या कॉमेडी ऑफ एरर्स या प्रसिद्ध नाटकावरुन प्रेरित होऊन रोहित शेट्टीने सर्कस हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात खास रोहित शेट्टी टच आहे. चित्रपटाची सुरुवात उटीच्या जमनादास अनाथ आश्रमापासून सुरुवात होते. या आश्रमातील जुळ्या मुलांपैकी एकाला श्रीमंत कुटुंब दत्तक घेतं, तर दुसरा मुलगा सर्कस चालवणाऱ्या कुटुंबात जातो. मोठी झाल्यावर एका वळणावर ही मुलं एकमेकांसमोर येतात. यानंतर सुरु होता धमाल आणि भुलभुलैय्याचा खेळ.