चाहत्यांची उत्सुकता संपली, अल्लू अर्जुनचा `Pushpa 2` या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpa 2 : दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पुष्पा-2 कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेता अल्लु अर्जूनने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Pushpa 2 : 2021 मध्ये 'पुष्पा' अर्थात अल्लू अर्जुनने (Allu Arjun) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. साऊथच्या अभिनेत्याने प्रेक्षकांची मनं जिंकत करोडोची कमाई केली होती. ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पुष्पा' चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक असो कि चित्रपटातील त्याचे डायलॉग असोत प्रचंड लोकप्रिय ठरले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार हे त्यावेळीच ठरलं होतं. पण तो कधी येणार याची मोठ्या काळापासून चाहत्यांना प्रतीक्षा होती. प्रत्येकाला प्रश्न पडला होता तो म्हणजे पुष्पा-2 कधी येणार. या प्रश्नाचं उत्तर आता स्वत: अल्लू अर्जुनने दिलं आहे.
अल्लू अर्जुन यांनी 'पुष्पा-2' (Pushpa-2)च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सोमवरी सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर करत 'पुष्पा-2' कधी येणार हे सांगितलं आहे. 'पुष्पा-2' हा चित्रपटा स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2024 ला प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धूम करण्यासाठी येत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पुष्पा चित्रपटाने जवळपास 300 कोटींची कमाई केली होती.
प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याबरोबरच अल्लू अर्जुनने चित्रपटाचं नवं पोस्टरही शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये (Poster) त्याचा चेहरा दिसत नाहीए. यात त्याचा फक्त हात दिसत असून पोस्टरवर मोठ्या अक्षरात 15 ऑगस्ट 2024 असं लिहिलेलं आहे. पुष्पाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुनबरोबर प्रमुख अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) दिसली होती. तसंच आयपीएल भंवर सिंह शेखावतची भूमिका साकारणारा फहाद फासिलही होता. तर आयटम साँगमध्ये समंथा प्रभू दिसली होती. हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाआधीच 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी टीझर शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. चित्रपटाच्या टीझरला तब्बल 6 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 'पुष्पा 2' च्या हिंदी व्हर्जनचे राईट्स 200 कोटींमध्ये विकले गेले आहेत. तर त्याचे ऑडिओ राईट्सदेखील 75 कोटींना विकण्यात आले आहेत.
पुष्पाच्या पहिल्या भागात मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) हिंदी डबिंग केलं होतं. पुष्पा-2 साठीही श्रेयस तळपदेच डबिंग करेल असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात पुष्पा साठी अल्लू अर्जूनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल होता.