Did Salman Khan Threaten Lawrence Bishnoi: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीनं घेतली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला इशारा देण्यासाठी आपण ही हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिष्णोई टोळीने केला आहे. या घटनेनंतर अनेकांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता सोशल मीडियावर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीला धमकावल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडीओ फेक असल्याची माहिती समोर येत आहे.


व्हायरल व्हिडीओत सलमान काय म्हणतोय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, सलमान खानने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला धमकावल्याचा दावा केला जात आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान, "मान्य आहे तू शूर आहेस, खूप शक्तीशाली आहे. मात्र तुझ्या कुटुंबातील सदस्याची तिरडी उचलू शकशील इतका तू शूर आणि शक्तीशाली आहेस का? त्यांच्या अंत्यसंस्कारनंतरच्या प्रार्थनासभेला तू उपस्थित राहशील का? तुझ्यात एवढी हिंमत आहे का? तू यमराजाप्रमाणे मृत्यूचा संदेशवाहक होऊ पाहत आहेस का?" असं म्हणताना दिसत आहे. 


अनेकांनी शेअर केला हा व्हिडीओ


हा व्हिडीओ आता व्हायरल केला जात असून सलमान खानने बिष्णोईला उद्देशून ही विधानं केल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ बिष्णोईशी कनेक्शन जोडत शेअर केला आहे. "सलमान खानचा लॉरेन्स बिष्णोईला संदेश, तुम्ही सलमानच्या पाठिशी आहात का?" असा प्रश्न विचारत सलमानच्या काही चाहत्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. काहींनी, "जे काही घडलं त्यानंतर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला धकमी दिली आहे," असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केलाय. 



व्हिडीओ मागील सत्य काय?


मात्र सध्या व्हायरल केला जाणार सलमान खानचा हा व्हिडीओ आताचा बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतरचा नसून 2020 सालातील असल्याचं समोर येत आहे. सलमान खानने हा व्हिडीओ कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव वेगाने होत असताना शूट केला होता. कोरोनासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना इशारा देताना सलमानने जनजागृतीसाठी हा व्हिडीओ शूट केला होता. कोरोना लॉकडाऊनचे नियम मोडू नका ते तुमच्या घरच्यांसाठीही महागात पडेल अशा संदेश यामधून देण्याचा उद्देश होता. 


तपास केल्यास काय आढळून आलं?


व्हायरल व्हिडीओमधील अनेक फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यास लॉजिकली फॅक्ट्स या फॅक्ट चेक वेबसाईटला असं आढळून आलं की सलमानने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 15 एप्रिल 2020 रोजी शेअर केला होता. हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीची आहे. हा व्हिडीओ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी नियम पाळावेत असं आव्हान करण्यासाठी असून यामध्ये कुठेही बिष्णोईचा उल्लेख नाही. याच संपूर्ण व्हिडीओतील काही तुकडा काढून ती क्लीप बिष्णोईला इशारा असं म्हणत चुकीच्या उद्देशाने व्हायरल केली जात आहे. 


सलमान संपूर्ण संदेश देताना काय म्हणालेला?


सलमानची जी क्लिप सध्या बिष्णोईला इशारा म्हणून व्हायरल केली जातेय ती कोरोना जनजागृतीच्या संपूर्ण व्हिडीओमधील शेवटकडचा तुकडा आहे. जो भाग व्हायरल झाला नाही त्यामध्ये सलमानने, "काही जोकर लोकांमुळे कोरोना विषाणू देशभरात पसरत आहे. तुम्ही नीट वागलात तर अनेक डॉक्टर्स, नर्स, पोलीस अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग होणार नाही. सारं काही आधीसारखं होईल. ही साथ चीनमध्ये सुरु झाली अशली तरी तिथे कामी झाली आहे. मात्र काही बेजबाबदार लोकांमुळे भारताला अधिक काळ लॉकडाऊनमध्ये रहावं लागेल," असं म्हटलं होतं. तुम्हीचा पाहा सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा संपूर्ण आणि खरा व्हिडीओ...



सलमानचा हा कोरोना जनजागृतीचा व्हिडीओ संसद टीव्ही या सरकारी युट्यूब चॅनेलवरही 16 एप्रिल 2020 रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओला, "लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांसाठी सलमानचा संदेश" अशा कॅप्शनसहीत शेअर करण्यात आलेला. 



निष्कर्ष काय?


यावरुनच असाच निष्कर्ष निघतो की सलमानने लॉरेन्स बिष्णोईला धमकी दिली नसून जुनाच व्हिडीओ वाटेल तिथे तुकडा पाडून बिष्णोईचा संदर्भ देऊन व्हायरल केला जात आहे.