Celebrity Sunglasses Selling For Rs 16 Lakh: संगीत क्षेत्रामध्ये पॉप म्युझिकला विशेष महत्त्व आहे. पॉप म्युझिकचे कोट्यवधी चाहते जगभरात आहेत. त्यामुळेच पॉप म्युझिक कॉन्सर्ट्सला फार मोठ्या प्रमाणात तरुणाई हजेरी लावताना दिसते. त्यातही अमेरिकन पॉप स्टार बियॉन्से (Beyonce) आणि शकिरासारख्या गायिकांच्या पॉप कॉनसर्टची तिकीटं लाखो रुपयांना विकली जातात. केवळ कॉन्सर्टच नाही तर अनेक देशांमध्ये या गायिकांची गाणीही सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक असतात. यामुळेच या कलाकारांची प्रचंड क्रेझ चाहत्यांमध्ये असते. म्हणूनच कॉन्सर्टला गेल्यानंतर आपल्यासोबत काहीतरी आठवण घेऊन येणाऱ्या चाहत्यांचा प्रयत्न असतो. त्यातही काही नशिबवान चाहत्यांना थेट आपल्या आवडत्या चाहत्याची एखादी खास गोष्ट मिळते आणि तो क्षण कायमचा अविस्मरणीय होऊन जातो.


अशा वस्तू विकण्याचा ट्रेण्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता या अशा खास गोष्टींच्या विक्रीचाही ट्रेण्ड जगभरात फार वेगाने पसरत आहे. कॉन्सर्ट मेमोरिबेलीय म्हणजेच कॉन्सर्टदरम्यान मिळालेल्या वस्तू विकत घेण्यासाठीही लाखो रुपये मोजणारे चाहते आहेत. यात अगदी कलाकारांनी ऑटोग्राफ दिलेल्या गोष्टींपासून त्यांनी परफॉर्मन्सदरम्यान परिधान केलेल्या कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा लिलाव केला जातो किंवा त्या निश्चित किंमतीला विकल्या जातात.


चाहता होणार लखपती


अशाच एका कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याला बियॉन्सेने चाहत्यांकडे भिरकावलेला गॉगल मिळाला. आता नशीबाने मिळालेल्या या भेटवस्तूमुळे हा चाहता लखपती होणार आहे. हा गॉगल आता तब्बल 20 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 16 लाख 38 हजार रुपयांना विकला जाणार असल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे.


हे फार कठीण पण...


मागील महिन्यामध्ये लंडनमध्ये झालेल्या बियॉन्सेच्या कॉन्सर्टला टिकटॉकर ग्लोबल व्हॅलेंटियानोने हजेरी लावली होती. व्हॅलेंटियानो हा व्हिआयपी लाउंजमध्ये बसला होता. तो बियॉन्सेच्या कॉन्सर्टमधील काही क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टीपत असतानाच बियॉन्सेने आपला गॉगल काढून त्याच्या दिशेने भिरकावला. सुरक्षारक्षक आणि इतर चाहत्यांबरोबर स्पर्धा करुन अखेर व्हॅलेंटियानो यांनी हा गॉगल मिळवला. आता 20 वर्षीय व्हॅलेंटियानो यांनी या गॉगलचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. "एक चाहता म्हणून हे फार कठीण असलं तरी हा निर्णय मी घेतला आहे," असं व्हॅलेंटियानोने सांगितलं.



या पैशांचं काय करणार?


बियॉन्सेचा गॉगल मी विकणार असलो तरी तिने मला हा गॉगल दिल्याचा क्षण आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे असंही व्हॅलेंटियानो म्हणाला. हा गॉगल्सचा लिलाव ओमेगा या वेबसाईटवरुन होणार आहे. या पैशांमधून व्हॅलेंटियानो त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबरोबरच करियरसाठी वापरणार आहे.