मुंबई : काही दिवसांपासून सर्वच क्षेत्रांमध्ये एकाच गोष्टीच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. त्या चर्चा आहेत जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या. दहशतवादाविरोधीच्या या संतप्त प्रतिक्रियांमध्येच माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी सामोपचाराने यावर तोडगा काढण्यासंदर्भातील वक्तव्य केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धूंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांचा रोष ओढावला. परिणामी त्यांना द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातूनही काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा विनोदवीर, अभिनेता कपिल शर्मा याने विरोध केला. सिद्धूंना कार्यक्रमातून काढण्याचा निर्णय या हा काही या सर्व परिस्थितीवर कायमचा तोडगा नसेल, असं म्हणत सिद्धूंचं समर्थन केलं. ज्यानंतर आता कपिल शर्मावरच चाहते संतापले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरचा राग व्यक्त करत अनेकांनीच त्याला खडे बोल सुनावले आहेत. इतकच नव्हे तर त्याच्या कार्यक्रमावरही बंदी आणण्याची मागणी सध्या अनेकांनीच केली आहे.




सिद्धूंना साथ देणाऱ्या कपिलवरच बंदी घालण्याची मागणी आता चाहते मोठ्या प्रमाणात करत आहेत. सोशल मीडियावर या संबंधीचा #BoycottKapilSharma असा हॅशटॅग ट्रेंडही करत आहे. त्यामुळे ही त्याच्यासाठी एक अडचणीची बाब असू शकते. मुख्य म्हणजे साधारण एक- दीड वर्षापासून कपिल कलाविश्वापासून बऱ्यापैकी दूर होता. ज्यानंतर त्याने पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. अडचणीच्या परिस्थितीचा सामना केल्यानंतर परतलेल्या कपिलच्या या भूमिकेचा फटका आता त्याला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.