`फत्तेशिकस्त` सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर
चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथेवर आधारित 'फत्तेशिकस्त' सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि युद्धनितीची कथा इतिहासात वाचल्या आहेत. शत्रूच्या गोटात घुसून 'फत्तेशिकस्त' करणारी शिवाजी महाराजांची युद्धनिती या सिनेमातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य आणि कुशल युद्धनीती अगदी स्पष्टपणे दिसत आहे. दिग्पाल लांजेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सिनेमात भरपूर कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबत जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे.
तसेच निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखे कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हिंदी सिनेमा आणि मालिकांमधील चेहरा अनुप सोनी या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमा 16 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू या न्यायाने लढले. ए. ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. 'फत्तेशिकस्त' 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.