मुंबई : मुझफ्फरपूर येथील स्थानिक न्यायालयात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अक्षय खन्ना आणि चित्रपटातील इतर कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाविरोधात दाखल करण्यात  आलेल्या याचिकेशी निगडीतच ही तक्रार असल्याचं म्हटलं जात आहे. संविधानिक पदांची प्रतिमा मलिन करण्याप्रकरणी ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅडव्होकेट सुधीर ओझा यांनी ही एफआयआर दाखल केली आहे. भारतीय दंडसंविधानाच्या कलम २९५, १५३, १५३ अ, २९३, ५०४ आणि १२० ब या अंतर्गत चित्रपटाचा प्रोमो हा भावना दुखावणारा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. शिवाय आपल्यी देशाचीही चुकीची आणि दयनीय प्रतिमा यातून दाखवण्यात आल्याचं त्यात म्हटलं गेलं आहे. 


भारतीय दंडसविधानाच्या या कलमांमध्ये विविध गटांमध्ये वैर निर्माण करणं, आक्षेपार्ह आणि अश्लील वत्सूंची विक्री करणं अशा बाबींची नोंद असणारे मुद्दे या एफआयआरमध्ये अधोरेखित करण्यात आल्याचं कळत आहे. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख जवळ येण्यासोबतच या चित्रपटाला होणारा विरोध अधिकच तीव्र होत आहे. 


भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. डॉ. सिंग यांचे तत्कालीन माध्यम सल्लागार संजय बारू लिखित पुस्तक 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर- मेकिंग एँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' यावर चित्रपटाचं कथानक आधारित आहे.  या चित्रपटातून तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद, राजकीय खेळी या साऱ्यावर प्रकाशझोत टाकण्यात आल्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून दाखण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा रोषही चित्रपटाने ओढावला आहे. तेव्हा आता येत्या काळात प्रेक्षक या चित्रपटाला कसा कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.