मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. अख्तर यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर मुलुंडमधील संघाचे स्वयंसेवक आणि वकील संतोष कुमार दुबेंनी मानहानीचा दावा केला. 8 दिवसात माफी न मागितल्यानंतर आता त्यांनी फौजदारी गुन्हाही नोंदवला आहे. त्यामुळे आता अख्तर यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, संतोष दुबे यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात सोमवारी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जावेद यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (बदनामीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



गेल्या महिन्यात, वकिलांनी जावेद अख्तर यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली होती, ज्यात त्यांनी एका टीव्ही मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल माफी मागण्यास सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे नक्की काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


जावेद अख्तर यांच्यावर काय आहेत आरोप?
तालिबान ज्याप्रमाणे अफगाणिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवू इच्छितो, त्याचप्रमाणे आरएसएस देखील भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी काम करत आहे. अख्तरांच्या या वक्तव्यानंतर आरएसएस कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.