अन्न सुरक्षा विभागाची रेस्टॉरंटवर धाड, साऊथचा `हा` अभिनेता अडचणींच्या फेऱ्यात...
साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षा विभागाने छापेमारी केली असून रेस्टॉरंटबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त बऱ्याच कलाकारांचा स्वत:चा वेगळा व्यवसाय आहे. हे कलाकार कधी सिनेमांमुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. साऊथचा प्रसिद्ध अभिनेता संदीप किशन सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. संदीपचं स्वत:च्या मालकीचं रेस्टॉरंट आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणा अन्न सुरक्षा विभागाला संदीपच्या ‘विवाह भोजनांबु' रेस्टॉरंटबद्दल माहिती मिळाली होती. अन्न सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार संदीपने खाद्यपदार्थांसंबंधित सहा कायद्यांचं उल्लंघन केलं होतं. या सगळ्या बद्दल संदीपने आता माध्यमांवर खुलासा केला आहे.
'रायन' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी संदीपने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला रेस्टॉरंटच्या प्रकरणाबाबत विचारण्यात आलं होतं. यावर संदीप म्हणाला की, त्याचं रेस्टॉरंट‘विवाह भोजनांबू’ हे त्याच्यासाठी फक्त पैसे कमविण्याचं स्त्रोत नाही. संदीप म्हणतो की, अन्नदान हे पुण्याचं काम आहे. आमच्या रेस्टॉरंटजवळ रक्तपेढी आहे. येथे येणाऱ्या गरजू लोकांना मोफत जेवणाची सोय व्हावी यासाठी 'भोजनांबू’ सुरु केलं.
काय म्हणाला संदीप ?
पुढे संदीप असंही म्हणाला की, रेस्टॉरंटची सगळीच टीम यात काम करते. आमची टीम दिवसाला काही फूड पॅकेट्स मोफत पुरवते. या सगळ्याचा महिन्याचा खर्च चार लाख होतो. म्हणजे महिन्याला आम्ही चार लाखांचं अन्न मोफत पुरवतोय तर काही थोड्याशा पैशांसाठी आम्ही एक्सपायरी डेट संपलेले धान्य का वापरु ? रेस्टॉरंटमध्ये काही किरकोळ समस्या आहेत हे मला मान्य आहे. पण म्हणून आम्ही खराब झालेलं धान्य वापरणं किंवा किचनची स्वच्छता न राखणं हा गैरप्रकार कधी केला नाही. महत्त्वाचं म्हणजे आमचं किचन अस्वच्छ आहे, असं अन्न सुरक्षा विभागाने सांगितलं नाही. उलट या सगळ्या छापेमारीच्या आमच्या रेस्टॉरंटवर काहीच परिणाम झाला नाही. तुम्ही किती प्रामाणिक आहात हे तुमचं काम सांगतं, असं मला वाटतं. आम्ही ग्राहकांना चांगलीच सेवा देतो. म्हणून छापेमारीच्या दुसऱ्या दिवशी रेस्टॉरंटवर ग्राहकांची जास्त गर्दी झाली. असं त्याने सांगितलं.
अन्न सुरक्षा विभागाचा दावा
तेलंगणाच्या अन्न सुरक्षा विभागाने रेस्टॉरंटबाबतचे दावे ट्विटरवर सांगितले आहेत. किचनमधल्या “२५ किलो तांदळाची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. 2022 ची एक्सपायरी असलेले तांदूळ किचनमध्ये का ठेवले? असा प्रश्न अन्न सुरक्षा विभागाने उपस्थित केला. याशिवाय अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य बंद डब्यात ठेवलेले नव्हते. कचऱ्याचा डब्बा देखील झाकलेला नव्हता. ग्राहकांना देण्यात येणारं पिण्याच्या पाण्यावर देखील अन्न सुरक्षा विभागाने संशय व्यक्त केला.