एड्सशी झुंज देणाऱ्या अभिनेत्यावर बेघर होण्याची वेळ
आपल्या या हलाखीच्या परिस्थितीविषयी म्हणतो...
नवी दिल्ली : 'एगहेड्स' या क्विज शोमुळे प्रकाशझोतात आलेला सीजे. डी. मूई सध्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहे. आर्थिक संकटांना तोंड देणारा मूई गेल्या कित्येक वर्षांपासून एड्स या गंभीर आजाराशीही लढा देत आहे. इतकच नव्हे, तर येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यावर बेघर होण्याचीही वेळ येणार आहे. त्यामुळे कलाविश्वात सध्या त्याच्या या परिस्थितीमुळे अनेकांनीच चिंता व्यक्त केली आहे.
मूईनेच ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून या परिस्थितीविषयीची माहिती दिली. ज्यामध्ये त्याने आपल्या अडचणी सर्वांसमोर मांडल्या. Mirror.co.uk च्या वृत्तानुसार ४९ वर्षीय मूई हा एकेकाळी प्रसिद्धीझोतात होता. एका लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या परीक्षकपदीही तो विराजमान होता. टेलिव्हिजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. पण, २०० मध्ये एका इसमाने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्याला कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
दरम्यान, आपल्या हलाखीच्या परिस्थितीविषयी सांगत मूईने आपल्या आजारपणाविषयी सांगितलं. 'गेल्या तीन वर्षांमध्ये मी ज्या काही गोष्टींचा सामना केला, त्याचं कारण हेच होतं की माझ्यापाशी काही काम नव्हतं. बाहेरुन मी सुदृढ दिसतो, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो, स्वत:ला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो', असं त्याने ट्विट करत लिहिलं. सोबतच आपल्याला साथ देणाऱ्या आणि मदत करु पाहणाऱ्या चाहत्यांचेही त्याने आभार मानले. मूईचं ट्विटर अकाऊंट हे त्याच्या मित्राकडून चालवण्यात येतं. जो त्याला मदत मिळावी म्हणून बरेच प्रयत्न करत आहे.
१९८८ मध्येही त्याच्यावर एका बेघर व्यक्तीच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. ज्याप्रकरणातून बाहेर पडण्यासाठी त्याला मोठा आर्थिक फटका बसला. पुढे जाऊन त्याच्यावर करण्यात आलेले हत्येचे सर्व अरोप मागे घेण्यात आले. पण, तोपर्यंत मूई कंगाल झाला होता. आता राहतं घरही त्याच्यापासून दुरावण्याची चिन्हं आहेत. आर्थिकदृष्ट्या त्याला मदत करण्यासाठी जनतेकडूनही सहकार्याची अपेक्षा करण्यात येत आहे. किंबहुना अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हातही पुढे केला आहे.