COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खासगी आयुष्याला एक नवं वळण देत आहेत. मग, ती दीपिका रणवीरची जोडी असो वा मग देसी गर्ल प्रियांका आणि निकची जोडी असो. याच कलाकारांच्या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या नावाची भर पडली आहे.


 



अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याने टेलिव्हिजन अभिनेत्री चारु असोपा हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे नेहमी सोशल मीडियावर आपल्या बहुरंगी पोस्टमुळे चर्चेत असणारी सुष्मिता यावेळी मात्र तिच्या भावामुळे चर्चेत आली आहे.



सुष्मिताचा भाऊ राजीव आणि चारु यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले याविषयीची माहिती समोर आली. खुद्द राजीवनेही त्याच्या पत्नीसोबतचे म्हणजेच चारुसोबतचे फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये त्याने आपण कायदेशीर रित्या चारुचा पत्नी म्हणून स्वीकार करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. कोर्ट मॅरेज केल्यामुळे त्यांच्या या विवाहसोहळ्याला कोणत्याच सेलिब्रिटीची उपस्थिती नव्हती.


दरम्यान, याअगोदर चारूचा साखरपुडा नीरज मालविया याच्यासोबत झाला होता मात्र त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर तिची आणि राजीवची भेट झाली. गेल्या बऱ्याच काळापासून ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. त्या दोघांची एका कार्यक्रमात भेट झाली होती. पुढे जाऊन त्यांच्या या ओळखीचं रुपांतर मैत्री आणि मग प्रेमात झालंय पाहता पाहता त्या दोघांनीही अखेर या नात्याला कायमस्वरुपी स्वीकारत सहजीवनाची शपथ घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छाही देण्यात आल्या.