नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळावर आधारित 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. येऊ घातलेल्या या सिनेमाबद्दल खुद्द मनमोहन सिंग यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपल्या गाडीतून उतरल्यावर पत्रकारांनी त्यांना या सिनेमाबद्दल प्रश्न विचारला. पण प्रश्न ऐकल्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तात्काळ तिथून काढता पाय घेतला आणि ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले.


मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ सलग दहा वर्षे पंतप्रधान पदावर कार्यरत होते. युपीए १ आणि युपीए २ या दोन्ही सरकारांचे नेतृत्त्व त्यांनी केले होते. त्याचा हा दहा वर्षांचा कार्यकाळ सरकारवरील विविध आरोपांमुळे गाजला होता. त्या पार्श्वभूमीवर याच कार्यकाळावर आधारित सिनेमा येत असल्यामुळे सिनेरसिकांमध्ये त्याची बरीच चर्चा आहे. 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमामध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका अभिनेते अनुपम खेर यांनी साकारली आहे. ट्रेलरमधून अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची प्रतिमा हुबेहूब साकारली असल्याचे बघायला मिळते. संजय बारू यांनी 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हे पुस्तक लिहिलेले आहे. याच पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे.  


सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर हन्सल मेहता म्हणाले की, राजकीय मतभेद हे कायम असतात. पण 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा सिनेमा कोणा एकाची बाजू घेत नाही. मी याच्याकडे एक महत्त्वपूर्ण कलाकृती म्हणूनच बघतो. लोकशाही, त्यातील विविध नेत्यांमुळे होणारे निर्णय आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य म्हणूनच मी सिनेमाकडे बघतो. 


दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्र युथ काँग्रेसच्या नेत्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना पत्र लिहिले असून, प्रदर्शनापूर्वी हा सिनेमा आम्हाला दाखविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. जर या सिनेमामध्ये कोणतेही दृश्य परिस्थितीला धरून नसल्याचे आढळले, तर ते काढून टाकण्याची मागणी आम्ही करणार आहोत. जर आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात आली नाहीत, तर या सिनेमाचे देशभरात प्रदर्शन होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.