...अन् रणवीरच्या चित्रपटाने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला रडवलं
निमित्त ठरला आहे तो म्हणजे.....
मुंबई : क्रिकेट आणि कला विश्वाचं नातं दर दिवशी एका वेगळ्या काणामुळे चर्चेत असतं. कधी कोणाचे प्रेमसंबंध या चर्चेला वाव देतात, तर कधी कोणाची मैत्री ही चर्चा खुलवते. सध्या या दोन्ही क्षेत्रांमध्ये चर्चेस निमित्त ठरला आहे तो म्हणजे एक बॉलिवूडपट.
अभिनेता रणवीर सिंग याने बॉलिवूडमध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांवर अनोखी अशी छाप पाडली. याच बळावर तो यशाच्या शिखरावरही पोहोचला. अशा या रणवीरचा एक चित्रपट पाहून दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी क्रिकेटपटूला रडू आलं. फक्त रडूच नव्हे, तर या चित्रपटाने त्याला आनंदही झाला आणि आश्चर्याचा धक्काही बसला. काही क्षणी तर त्याच्या अंगावर शहारेही आले.
रणवीरचा चित्रपट पाहून त्यावर दिलखुलास प्रतिक्रिया देणारा हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स. जॉन्टी आणि भारताचं नातं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. गेल्या काही काळापासून जॉन्टी #GullyBoy या चित्रपटाची गाणी ऐकत होता. ज्यानंतर अखेर त्याला हा संपूर्ण चित्रपट पाहण्याची संधी मिळाली.
विमानप्रवासादरम्यान त्याने हा चित्रपट पाहिला. ज्यानंतर ट्विट करत त्याने #GullyBoyविषयी प्रशंसा करणारं एक ट्विट लिहिलं. यामध्ये चित्रपटाचं कौतुक करत त्याने कलाकारांच्या अभिनयाचीही दाद दिली. जॉन्टीच्या या ट्विटनंतर चित्रपटाच एमसी शेर साकारणाऱ्या सिद्धार्थ चतुर्वेदी या अभिनेत्यानेही याविषयी आनंद व्यक्त केला.