मुंबई : मनोरंजन विश्वात सध्याच्या घडीला एकंदर हवा पाहता गेम ऑफ थ्रोन्स या काल्पनिक सीरिजचा शेवट झाला आहे. आठव्या पर्वासह या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. संपूर्ण विश्वातील प्रेक्षकांनी या सीरिजचा शेवट झाल्यानिमित्त ट्विट करत त्यातील प्रत्येक पात्राविषयी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. फक्त प्रेक्षकच नव्हे, तर 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील कलाकारांनीही या सीरिजच्या शेवटच्या भागाला आणि एकंदर सीरिजला मिळालेला प्रतिसाद पाहता भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटर ट्रेंडवरही याच सीरिजची छाप पाहायला मिळत असून, प्रत्येकजण याविषयीच चर्चा करत आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील अभिनेत्री सोफी टर्नर हिनेही या सीरिजची आपल्या आयुष्यात नेमकी काय भूमिका होती आणि यापुढेही राहील, याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 


शौर्य, धैर्य आणि बळकटी नेमकी काय असते हे आपल्याला 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील पात्राने शिकवलं. शिवाय प्रेमापर्यंत पोहोचवणाऱ्या संयमाचीही शिकवण याच सीरिजमुळे मिळाल्याचं ती म्हणाली. वयाच्या १३ व्या वर्षी या सीरिजशी सोफी जोडली गेली होती, तर वयाच्या २३ व्या वर्षी ती या सीरिजला मागे सोडत आहे.  पण, सीरिजमुळे मिळालेली शिकवण मात्र तिने मागे सोडलेली नाही हे मात्र तिने या पोस्टमध्ये आवर्जून लिहिलं. 




सीरिजच्या संपूर्ण टीमसह एक फोटो पोस्ट करत या सीरिजमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल निर्माते- दिग्दर्शकांचे आभार मानले. सोबतच तिने चाहत्यांचेही आभार मानले. पहिल्या भागापासून ते अखेरच्या भागापर्यंत सीरिजला मिळालेलं चाहत्यांचं प्रेम कायम आपल्या स्मरणात राहील, असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.