मुंबई : कोरोनाची दहशत असताना एका अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. गुरूवारी ही दुःखद घटना घडली असून या घटनेने चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. उत्तराखंडातील गायिका आणि लोकप्रिय अभिनेत्री रीना रावतचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने रीनाचं निधन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर उत्तराखंड सिनेमा आणि संगीत क्षेत्रात शोक व्यक्त केला जातोय. अशी माहिती मिळतेय की, रीना गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. रीनाने 'पुष्पा छोरी...' या लोकगीतासोबतच 'भग्यान बेटी', 'मायाजाल', 'फ्योंली ज्वान व्हेगी' या सुपरहिट गाण्यांमध्ये तिने अभिनय देखील केला आहे. 



रीना रावतने उत्तराखंडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. यामध्ये पन्नू गुंसाई, जयपाल नेगी, गीता उनियाल सारख्या मान्यवरांची नावे आहेत. 38 वर्षांच्या रीना रावतने अगदी लहानवयातच आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबतच तिन्हे लोककला आणि संस्कृतीच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावली आहे.   



अभिनेता पन्नू गुंसाई यांनी सोशल मीडियावर रीनासोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांचा टिकटॉक व्हिडिओ देखील आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून रीनाच्या जाण्याचं दुःख व्यक्त केले आहेत. रूग्णालयात असताना तिने एकदा पन्नू यांच्याशी संपर्क साधला होता. 


दिल्लीच्या रूग्णालयात रीनावर उपचार सुरू होते. 2005 मध्ये रिनाचं लग्न झालं होतं. तिला एक मुलगा सुद्धा आहे. तिचा पती दीपिक रावत एका सरकारी कार्यालयात काम करतो. 2000 पासून जवळपास 8-10 वर्ष रिना रावत उत्तराखंडच्या सिनेमांमधील आघाडीची अभिनेत्री होती.