Gautami Deshpande Grand Father Death: सध्या गौतमी देशपांडे ही अभिनेत्री चर्चेत आहे. तिची सोशल मीडियावरील एक भावुक करणारी पोस्ट व्हायरल होते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिनं आपल्या आजोबासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या आजोबांनी दु:खद निधन झाले आहे. त्यामुळे त्यांना अखेरचा निरोप देताना गौतमीची डोळे पाणावले आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. मृण्मयी देशपांडेप्रमाणेच तिची बहीण गौतमी देशपांडेही चर्चेत असते. तिनंही अनेक लोकप्रिय मालिकांतून कामं केली आहेत. तिची 'झी मराठी वाहिनी'वरील 'माझा होशील ना' ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतून विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची जोडी प्रचंड गाजली होती. त्यामुळे त्यांची आजही चर्चा रंगताना दिसली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतमी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. यावेळीही तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी आपल्या आजोबांसाठी तिनं खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहिलं आहे की, ''प्रिय आजोबा. पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळ्या भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं. पण आजोबा काय सांगू तुम्हाला. इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका! प्रत्येक भूमिकेच वेगळेपण जपलं तुम्ही. कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं. सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून. नंतर आईचा पुनर्विवाह. नवीन कुटुंबामध्ये प्रवेश. नवीन भावांचं सख्ख्यांपेक्षा जास्त प्रेम. तुमच्यासारख्या handsome नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश. नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम. लग्न. दोन गोड मुलांचा जन्म. सारचं कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असं.


तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा. “एखाद्याचं नशीब” म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात आली. नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले. मग “याला जीवन ऐसे नाव” म्हणत तुम्ही पुढे गेलात. “अशी पाखरे येति” म्हणत संसार सुरु झाला.” नाटककाराच्या शोधात तुम्ही सहा पात्र” फिरत गेलात. पुढे “शेहेनशाह” बनून तुम्ही “नटसम्राट” असल्याचा दाखवून दिलंत. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं “तो मी नव्हेच ” म्हणत राहीलात. असे आयुष्याचे खरे खुरे “किमयागार ” ठरलात. “चाणक्य ” बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही.



प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो. यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर. तुम्ही आता मात्र शांत व्हा. दमला असाल तुम्ही. आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे. नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे. तुमच्यातला हा ‘नट ” आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू. अन तुमच्या 10% तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू. तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य ….झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा ….!! रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते. अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते. तुमची नात आणि तुमची फॅन. गौतमी.


गौतमी देशपांडे यांचे आजोबा अरविंद काणे यांनी 1953 सालापासून काम करण्यास सुरूवात केली होती. तेही उत्तम अभिनेते होते. त्यांनी 'तो मी नव्हेच' या नाटकाचे 750 प्रयोग केले.