काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या १२ व्या पर्वाचीच चर्चा सध्या कलाविश्वात सुरु आहे. अगदी पहिल्याच भागापासून या कार्यक्रमाची चर्चा होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे त्यात सहभागी झालेले स्पर्धक. भजन सम्राट अनूप जलोटा आणि त्यांची तथाकथित प्रेयसी जसलीन मथारू यांच्या नात्याविषयीच्या चर्चांनी तर यामध्ये सर्वाधिक जोर धरला आहे. 'आयटम' गर्ल राखी सावंत हिनेही जलोटा आपल्या नातीच्या वयाच्या मुलीला डेट करत असल्याचं म्हटलं होतं. जसलीनसोबतच्या नात्यामुळे विविध स्तरांतून जलोटा यांच्यावर टीका होत असून त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. अशी ही सर्व परिस्थिती पाहता अनूप जलोटा यांचे खास मित्र आणि गझल गायक तलत अझीज यांनी त्यांची बाजू घेत काही गोष्टी सर्वांसमोर उघड केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पती, मित्र आणि भाऊ या भूमिका अनूप जलोटा यांनी कशा प्रकारे अतिशय सुरेखरित्या बजावल्या आहेत हे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलं. 


एक पती, खांदयाला खांदा लावून साथ देणारा मित्र म्हणून अनूप जलोटा हे खरंच अनुकरणीय आहेत, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं. त्यासोबतच पत्नी मेधा यांच्या आजारपणात १४ वर्षे कशा प्रकारे त्यांनी मोठ्या धीटपणे समोर आलेल्या प्रसंगाचा सामना केला याविषयीचाही उलगडा केला. 



जलोटा यांच्याविषयीची ही भावूक पोस्ट लिहित म्हटलं, 'अझीज यांनी अनेक वर्षांनंतर जलोटा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सर्वांसमोर आले आहेत, तो त्यांचा हक्कच आहे. किंबहुना जोपर्यंत ते इतरांच्या भावना दुखावत नाहीत तोपर्यंत आपल्या नात्याविषयी निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.' या भावूक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जलोटा यांना 'बिग बॉस'च्या वाटचालीसाठी जलोटा यांना शुभेच्छाही दिल्या.