`त्या` एका रात्रीत बदललं गुलजार- राखीचं वैवाहिक नातं; क्षणात एकमेकांपासून दुरावले
हॉटेलवर रात्री नेमकं काय घडलं?
Gulzar : काही माणसांच्या हातात जादू असते असं म्हणतात. देवाची देणगी म्हणा किंवा आई- वडिलांची पुण्याई, दशकातून एखादं असं बाळ जन्माला येतं जे खऱ्या अर्थानं त्याचं नाव उज्वल करतं आणि नशिबाच्या खेळीलाही डोळे चमकवायला भाग पाडलं. असंच एक व्यक्तीमत्त्वं म्हणजे ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक गुलजार.
संपूरण सिंग कालरा, असं गुलजार यांचं मूळ नाव. कलाविश्वातील त्यांला प्रवास अनेकांसाठी आदर्श. गुलजार बोलू लागले की असं वाटतं की त्यांनी बोलतच रहावं आणि आपण ऐकत रहावं.
एक कलाकार म्हणून गुलजार जितके संपन्न होते, तितकेच ते एक व्यक्ती म्हणूनही संपन्न होते. त्यांचं खासगी आयुष्यसुद्धा चाहत्यांसाठी कायमच कुतूहल. नात्यांची परिभाषा बदलत त्यांनी अभिनेत्री राखी यांच्याशी असणारं नातं निभावलं. त्यांच्या याच नात्यात एक असं वादळ आलं होतं, ज्यामुळं एका रात्रीत संपूर्ण परिस्थितीच बदलली.
1972 या वर्षापर्यंत राखी यांच्या प्रेमात गुलजार आकंठ बुडाले होते आणि त्यांच्याकडून गुलजार यांच्या प्रेमाला तसाच प्रतिसाद मिळाला. 1973 मध्ये या जोडीनं लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधीच गुलजार यांनी राखी यांच्याकडे आपलं मन मोकळं केलं होतं.
जुने विचार आणि लग्नानंतर राखी यांनी अभिनय न करणं अशा अटी त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. राखी यांनी तरीसुद्धा गुलजार यांच्या चित्रपटातून काम करण्याची संधी आपल्याला मिळेलच ही आशा कायम ठेवली होती. पण, असं कधीच झालं नाही. उलटपक्षी त्यावेळी हिंदी कलाविश्वात असे काही निर्माते आणि दिग्दर्शक होते, जे राखी यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक होते. (gulzar rakhee)
पुढे असं काय घडलं की त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या... ?
गुलजार (kashmir) काश्मीरमध्ये 'आँधी' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहोचले होते. त्यावेळी राखीसुद्धा त्यांच्यासोबतच होत्या. तिथं संजीव कुमार, सुचित्रा सेन या कलाकारांसह गुलजार यांनी एक लहानसं गेट टुगेदर केलं. जिथं सुचित्रा यांच्यासोबत संजीव कुमार यांनी गैरवर्तन केलं.
झाला प्रकार सावरून नेण्यासाठी गुलजार यांनी पुढाकार घेतला आणि ते सेन यांना त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून गेले. राखी यांना मात्र गुलजार यांचा हा निर्णय पचला नाही. त्यांनी आपली नाराजी गुलजार यांच्याकडे व्यक्त केली. पण, पत्नीचं असं वागणं गुलजार यांनाही खटकलं. वाद इतका विकोपास गेला की त्यांनी राखी यांच्यावर हात उगारला.
... एका क्षणात नात्यात दुरावा
दुसऱ्या दिवसाची सकाळ या नात्यात दुरावा घेऊन आली. राखी यांनी यश चोप्रा यांच्या 'कभी कभी' चित्रपटात काम करण्यातचा निर्णय घेतला आणि तिथं कलाजगतामध्ये राखी- गुलजार यांच्या नात्याला गेलेला तडा जगजाहीर झाला.
आई- वडिलांच्या नात्यात आलेला हा दुरावा गुलजार यांची लेक मेघना पचवू शकली नाही. तिच्यासाठी म्हणून त्या दोघांनीही घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला. नात्यामध्ये दुरावा आला असला तरीही गुलजार राखी यांना एका पत्नीप्रमाणंच वागवत होते.
Best Split Couple
एका मुलाखतीमध्ये तर आम्हाला best split couple म्हणून पुरस्कार मिळायला हवा, असं म्हणत राखी यांनी त्यांचं हे नातं जगासमोर ठेवलं. झालं-गेलं विसरत नात्याची कटू बाजू मागे सारत गुलजार आणि राखी यांनी हे नातं एका वेगळ्या रुपात टिकवलं आणि निभावलं.