महिलेवर थुंकून हेअरकट करणाऱ्या जावेद हबीबचा नवा Video व्हायरल, पाहा आता नवं काय...
नेटकरी संतप्त
मुंबई : प्रख्यात हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या एका व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. एरव्ही जावेद हबीब यांच्याकडून हेअरड्रेसिंग किंवा हेअर स्टायलिंग करुन घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र अनेकांचीच ही इच्छा नाहीशी झाली. कारण ठरलंय हबीब यांचं एक कृत्य. (Jawed Habib)
झालं असं की मुझफ्फरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हबीबनं हेअरकट करताना चक्क महिलेच्या केसांत तो थुंकला.
सोशल मीडियावर याचा व्हिडीओ अतिशय वेगानं व्हायरल झाला. मुख्य म्हणजे पाणी नाहीये, हरकत नाही.... असं म्हणत जो दावा करत हबीब महिलेच्या केसांत थुंकला याची अनेकांनाच चीड आली.
अनेक स्तरांतून त्यानं स्वत:वर रोष ओढावला. पाहता पाहता महिला आयोगानंही त्याच्यावर तीव्र शब्दांत नाराजीचा सूर आळवला.
प्रथमत: हबीबनं झाल्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, त्यानंतर मात्र आता त्यानं एका व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितल्याचं म्हटलं जात आहे.
'माझ्या सेमिनारमध्ये मी सांगितलेल्या काही गोष्टींमुळे काहींना वाईट वाटलं आहे. पण, मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, या सेमिनारमध्ये सर्व प्रोफेशनल व्यक्ती आलेल्या असतात.
पण, तरीही माझ्या वागण्या- बोलण्यानं कोणालाही वाईट वाटलं असेल, तर खरंच मला क्षमा करा... मनापासून माफी मागतोय', असं तो म्हणाला.
आपल्या कृतीबाबत हबीबनं दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्याच्यावर असणारा रोष काही कमी झालेला नाही.
तेव्हा आता हे प्रकरण आणखी किती दिवस तापतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मी न्हाव्याकडे केस कापेन पण हबीबकडे नाही...
दरम्यान, ज्या महिलेचे केस कापताना हबीब तिच्यावर थुंकले तिनंही सदर प्रकरणी तीव्र निराशा व्यक्त केली.
'मी त्यांच्याकडे केस कापले नाहीत. त्यांनी मला खूप चुकीची वागणूक दिली. ही अशी अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळं मी हेअरकट केला नाही.
मी एखाद्या गल्लीबोळातल्या न्हाव्याकडून केस कापेन पण, हबीबकड़ून कधीच कापणार नाही', असं ती म्हणाली होती.