चेतन भगतला रस्त्यावर त्याचच पुस्तक विकलं जातं तेव्हा...
एक नवा आणि अनपेक्षित अनुभव
मुंबई : सहसा एखाद्या सिग्नलला किंवा रस्त्यावर कार किंवा इतर कोणतं वाहन थांबलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. आता पुढची किती मिनिटं, तास याच ठिकाणी थांबावं लागणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतो. याच परिस्थितीचा सामना सेलिब्रिटी लेख चेतन भगत यालाही करावा लागला. पण, त्यातही त्याला एक नवा आणि अनपेक्षित अनुभव आला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चेतनने याविषयीचा एक व्हिडिओही पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर कार थांबलेली असताना पुस्तक विक्री करणारा एक मुलगा कारच्या खिडकीपाशी येतो आणि त्याला पाहून चेतन भगत कारच्या खिडकीची काच खाली करतो. पुढे स्वत: चेतनच त्या मुलाला 'चेतन भगत है?', असा प्रश्न करत स्वत:च्याच पुस्तकाची प्रत आहे का, असा प्रश्न विचारत आहे. त्याच्या या प्रश्नाला उत्तर देत तो मुलगाही चेतन भगला त्याच्याच पुस्तकाची प्रत काढून दाखवतो.
'ही ऑनलाईन प्रत आहे...', असं सांगत तो पुस्तक विक्री करणारा मुलगा चेतनला त्यानेच लिहिलेलं पुस्तक विकण्याचा प्रयत्न करताना दिसतो. चांगला प्रतिसाद आहे या पुस्तकाला, असं सांगताना दिसतो. पुढच्याच क्षणाला जेव्हा चेतन भगत आपणच त्या पुस्तकाचे लेखक आहोत, असं सांगतो त्यावेळी त्या पुस्तक विक्री करणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे आहेत.
पुस्तकाच्या फार प्रती विकल्या गेल्या आहेत, असं सांगत तो मुलगा एका अर्थी थक्क होत चेतन भगतकडेच पाहताना दिसत आहे. चेतन आणि त्या मुलासाठी ही अशी अनोखी भेट पूर्णत: अनपेक्षितच होती. याचविषयी व्हिडिओ पोस्ट करत चेतनने लिहिलं, मी पुस्तकाच्या खोट्या प्रती विकण्याला प्राधान्य देत नाही. पण, अशानेच त्यांचा उदरनिर्वाह होत आहे. मी एक सांगू इच्छितो की त्यांनी खरी प्रत विकावी. अनेकजण खरी प्रत विकूही लागले आहेत, असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं.