COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोहक आणि आपलीशी संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पद्धतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच  सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात सर्व कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून लेखक अभिनेता अशी ओळख असलेले हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पणा करत आहेत.  


घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते. तसेच रीमा आणि मोहन जोशी या दांपत्यामधील निखळ आणि विनोदीकिस्से मनाला भावतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असललेल्या घराच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळेल हे कळताच रीमा यांची उतारवयात सर्वसुखसुविधायुक्त अशा उच्चभ्रू इमारतीतील घर घेण्याची इच्छा होते; पण घराविषयी जिव्हाळा बाळगणारे मोहन जोशी घर विकण्यास कदाचित तयार नाहीत. स्पृहा जोशी साकारात असलेली अवखळ देवीका आणि हृषिकेश जोशी यांचा साधा, मध्यमवर्गीय सोपान सुद्धा मनाला भावणारा आहे. येतो. शिवाय विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी यांची झलक दिसते, यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.


‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ हे गीत लक्षवेधून घेते.  तर सचिन पिळगांवकर यांच्या आवाजत 'हाय काय नाय काय' ऐकायला मज्जा येते. या चित्रपटाचे निर्माते हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर आहेत, तर आकाश पेंढारकर, विनोद सातव प्रस्तुतकर्ते आहेत.


या चित्रपटाचे स्वीट होम पार्टनर 'हावरे प्रॉपर्टीज' असून या ट्रेलर लॉंच प्रसंगी हावरे प्रोपर्टीज प्रॉपर्टीजचे सीईओ अमित हावरे आणि सीएफओ अमर हावरे उपस्थित होते. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं, असं सांगणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.