ना अॅक्टर, ना दिग्दर्शक, ना निर्मात्या...तरीही Cannes मध्ये कशा पोहोचल्या अमृता फडणवीस?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेल्या आहेत.
मुंबई : सध्या उठसूट कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या चर्चा कानावर येतायत. भारतातील ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण तसंच उर्वशी रौतेला या अभिनेत्री तिथल्या रेड कार्पेटवर दिसल्या. मामे खान नावाचा राजस्थानी लोककलाकार देखील कान्सला गेला. अशातच सोशल मीडियावर एक फोटो येऊन धडकला. आणि या फोटोची एकच चर्चा सुरु झाली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेल्या आहेत. अमृता फडणवीस यांचा फोटो होता तो विमानतळावरचा. यावेळी कान्सच्या परंपरेप्रमाणे त्यांनी एखादा गाऊन किंवा भारीतली साडी न घालता, साधाच ड्रेस घातला होता.
अमृता फडणवीस कान्सला कशा गेल्या?
कान्स फेस्टिवलमध्ये अमृता फडणवीस यांना पाहिल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न आला की, यांना एन्ट्री मिळाली कशी? तर जाणून घेऊया कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुणाकुणाला प्रवेश आहे.
तर पहिली कॅटेगरी आहे, ज्यांच्याकडे फेस्टिव्हल ॲक्रीडेशन आहेत अशा व्यक्ती. चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोकांनाच हे ॲक्रीडेशन मिळतं. यामध्ये अभिनेते-अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश असतो.
दुसरं असतं इंडस्ट्री वर्कशॉप्स ॲक्रीडेशन. कान्स फेस्टिव्हलमध्ये अनेक तंत्रज्ञही उपस्थिती लावतात. सोबतच शॉर्ट फिल्म्स विकणारे आणि त्या विकत घेणारे मोठे निर्माते आणि प्रयोगशील कार्यकर्तेही कान्समध्ये येतात.
त्यानंतर असतात चित्रपट-लघुपट-माहितीपटाचे निर्माते, यांच्यासाठीही खास सोय असते. जगभरातल्या चित्रपटांचं मार्केट हाताळणाऱ्यांना कान्समध्ये प्रवेश मिळावा यासाठी मार्केट ॲक्रीडेशन असतं.
शिवाय कान्समधील घडामोडी जाणून घेण्यासाठी पत्रकारांनाही वेगळं ॲक्रीडेशन मिळतं.
मात्र वरील कोणत्याही गटात अमृता फडणवीस बसत नाहीत. तरीही त्या कान्समध्ये का गेल्या? तर याचं उत्तर म्हणजे तर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून.
कान्स हे केवळ फिल्म फेस्टिव्हल नाही. याठिकाणी भाषणं होतं असून मोठमोठ्या लोकांना बोलावलं जातं आणि जगाची प्रगती कशी होईल या विषयांवर चर्चा होतात.
यावेळी बेटर वर्ल्ड फंड नावाच्या एका संस्थेने ‘UN Sustainability Development Goals’ विषयाला अनुसरुन एक चर्चासत्र ठेवलं. पर्यावरण, समुद्र यांचं रक्षण अशी त्यांची थीम होती. याच्यावर सामाजिक कार्यकर्ते आपले विचार मांडतात. यासाठीच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमृता फडणवीस यांची निवड झाली आहे. त्या फूड सस्टेनबिलिटी या फोरमच्या थीमवर बोलणार आहेत.
मुख्य म्हणजे अमृता फडणवीस गेल्या काही वर्षांपासून शाश्वत ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षण या विषयासंदर्भाक काम करतायत. 2018 मध्ये वर्ल्ड पीस अँड डिप्लोमसी ऑर्गनायझेशनने ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऍक्सीलेटर अवॉर्ड’ दिले, या कार्यक्रमालाही त्या उपस्थित होत्या.