बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपला आगामी चित्रपट 'पठाण'मुळे चर्चेत आहे. 25 जानेवारीला 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होणार असून मनोरंजनासह इतर क्षेत्रांचंही याकडे लक्ष लागलं आहे. 'बेशरम' गाण्यावरुन झालेला राजकीय वाद लक्षात घेता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी एखादा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शाहरुख तब्बल पाच वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 2008 मध्ये आलेला 'झिरो' हा शाहरुखचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पठाण चित्रपटाकडे बॉलिवूडचंही लक्ष लागलं आहे. 2023 मध्ये यशराजकडून प्रदर्शित होणारा हा पहिलाच मोठा चित्रपट आहे. पठाणमध्ये शाहरुख खानसह दीपिका आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात जॉन व्हिलनच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. याआधी सिद्धार्थ आनंदचा 'वॉर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 


शाहरुख खानने किती मानधन आकारलं?


पठाण हा बिग बजेट चित्रपट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटासाठी तब्बल 250 कोटी खर्च करण्यात आले आहेत. मग शाहरुख खानने चित्रपटासाठी किती मानधन घेतलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चित्रपटासाठी शाहरुख खानने 35 ते 40 कोटी घेतल्याची माहिती आहे. 


हा आकडा तुम्हाला धक्का बसला असेल ना? पण शाहरुखचं मानधन कमी असण्याचं कारण म्हणजे चित्रपटाच्या कमाईतही तो भागीदार आहे. अक्षय कुमार, आमीर खान, सलमान खान यांच्यासह अनेक अभिनेते सध्या हेच मॉडेल अवलंबत आहेत. यानुसार चित्रपटासाठी कमी मानधन आकारलं जातं आणि चित्रपटाच्या नफ्यातील ठराविक हिस्सा घेतला जातो. 


पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 35 ते 40 कोटींची कमाई करेल असा अंदाज आहे. पठाणचं अॅडव्हान्स बुकिंग फूल होईल अशीही शक्यता आहे. शाहरुख खानच्या हॅप्पी न्यू ईअर चित्रपटाने पहिल्या दिवशी 36 कोटींची कमाई केली होती. पठाण चित्रपट हा रेकॉर्ड मोडण्याचा अंदाज चित्रपट तज्ञ्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.