मुंबई : 'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे !  गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच 'बॉईज' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या आगामी 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे ऋषिकेश जोशी झळकणार आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या सिनेमात त्याची हटके भूमिका असून, 'वाघेऱ्या' नामक वेड्यांच्या गावात एका शहाण्या ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत तो दिसणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांसाठी हास्याची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे. 


लग्नाच्या बोहल्यावरून थेट कामावर रुजू झालेल्या, एका नवविवाहित तरुणाची कैफियत यात  ऋषिकेश मांडणार आहे. आतापर्यंत सदरा, झब्बा तसेच पायजमामध्ये दिसणारा ऋषिकेश या सिनेमात मात्र शहरी बाबूच्या लुकमध्ये पाहायला मिळणार आहे. ग्रामीण जीवनातील हलके फुलके विनोद मांडणाऱ्या या सिनेमात ऋषिकेशबरोबरच,  किशोर कदम, भारत गणेशपुरे, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज विनोदवीरांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.


हास्याची  तुफान आतषबाजी करणाऱ्या या सिनेमातील 'वाघेऱ्या' गावाची गम्मत अनुभवायची असेल, तर येत्या १८ मे पर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे. वेड्यांच्या या गावात जाण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !