मुंबई : अभिनेता हृतिक रोशनचा बहुचर्चित 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास ११.८३ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरहिरोची भूमिका साकारणाऱ्या हृतिकने 'काबिल'मध्ये एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला अनेक चाहत्यांची पसंती मिळाली. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रकारची, शिक्षकाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या हृतिकला याही भूमिकेसाठी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. 



या आठवड्यात 'सुपर ३०'सोबत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे शनिवार आणि रविवारमध्ये चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपट समिक्षकांकडूनही चित्रपटाला चांगले रेटिंग्ज देण्यात येत आहेत. चित्रपटाचं कथानक अनेक तरुणांच्या पसंतीस उतरत असल्याचंही समोर येत आहे.


'सुपर ३०' सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक बिहारमधील सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. हृतिकच्या आतापर्यंत आलेल्या चित्रपटातील भूमिकांपेक्षा या चित्रपटातील भूमिका अतिशय निराळी आहे. 'क्रिश'नंतर आता 'सुपर ३०' हृतिकला एक वेगळी ओळख देऊ शकतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.