अनन्या होण्यासाठी ऋताचा प्रेरणादायी प्रवास
खास व्हिडिओ आणि सिनेमाचा टिझर सोशल मीडियावर लाँच
मुंबई : रंगभूमीवर गाजलेलं अनन्या हे नाटक आता चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येणार आहे. अतिशय प्रेरणादायी असं कथानक या चित्रपटातून मांडण्यात आलं असून, अनन्या साकारण्यासाठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं घेतलेले कष्ट प्रेरणादायी आहे. नुकताच या प्रेरणादायी प्रवासाचा व्हिडीओ आणि चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर महिलादिनाच्या निमित्ताने लाँच करण्यात आला आहे. येत्या ३१ जुलैला हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.
ड्रीमव्हिवर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मेघना जाधव आणि सतीश जांबे हे सहनिर्माते आहेत.स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अनन्या होण्यासाठीचा ऋतानं केलेला प्रवास एका व्हिडिओद्वारे उलगडण्यात आला आहे. तसेच एक टीझरही सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.अनन्याच्या आव्हानात्मक भूमिकेसाठी प्रचंड शारीरिक मेहनत, मानसिक तयारी ऋतानं केली आहे. तिची शारीरिक तयारी करून घेण्यासाठी खास ट्रेनर नेमण्यात आले होते.
अनन्या भूमिका साकारण्याच्या अनुभवाविषयी ऋता म्हणाली, 'पदार्पणासाठी इतकी अप्रतिम भूमिका मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ऑडिशन दिल्यावर माझी निवड झाल्याचं कळल्यावर ते स्वतःला पटवण्यात पुढचे काही दिवस गेले. अपघातात हात गमवलेल्या मुलीच्या या भूमिकेसाठी खूप शारीरिक-मानसिक तयारी करावी लागणार असल्याची कल्पना दिग्दर्शक प्रताप फड यांनी दिली होती. त्यामुळे दिग्दर्शकाला शरण जाऊन त्यांच्या मनातली भूमिका साकारायचं ठरवलं. अगदी प्रत्येक एक्स्प्रेशन त्यांच्याकडून समजावून घेतली. हा अनुभव खूपच कमाल होता.'
'निर्माता रवी जाधव यांच्यासह माझे सर्व तंत्रज्ञ, कलाकार यांच्या सहकार्यामुळे हा चित्रपट करणं शक्य झालं. ऋतानं या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत,' असं दिग्दर्शक प्रताप फड यांनी सांगितलं.