ऋतिकने नाव केलं `रोशन`; आंतरराष्ट्रीय पुस्तकात मिळाली विशेष जागा
`Stories for boys who dare to be different` या पुस्तकातून उलघडणार ऋतिकचा जीवनप्रवास
नवी दिल्ली : जगातील सर्वात सुंदर पुरुष म्हणून अभिनेता ऋतिक रोशनची ओळख आहे. ऋतिक रोशनने नेहमीच त्याच्या अनेक संघर्षाबाबत खुलपणाने चर्चा केली आहे. नुकतीच ऋतिकच्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासाची दखल घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पुस्तक 'बेन ब्रूक्स'मध्ये ऋतिकने आपली जागा बनवली आहे. 'Stories for boys who dare to be different' या पुस्तकात बीथोवेन, बराक ओबामा, फ्रॅंक ओसन यांसारख्या महान व्यक्तींसह ऋतिकच्या संघर्षांला चित्रित करण्यात आले आहे.
याबाबत ऋतिकने सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर आभार व्यक्त करत या पुस्तकाचं पोस्टरही शे्अर केलं आहे. 'मला पुन्हा त्या जुन्या आठवणीत जायचं आहे आणि ११ वर्षाच्या त्या ऋतिकला आज हा दिवस दाखवण्याची इच्छा असल्याचं' ऋतिकने इंन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पुस्तकासाठी त्याने धन्यवादही दिले आहेत.
या पुस्तकात एका लहान मुलाच्या रुपात ऋतिकने सामना केलेल्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे. लहानपणी बोलताना अडखळत बोलण्याच्या समस्येमुळे इतरांशी बोलताना त्याला कशाप्रकारे संकोच वाटायचा, स्कोलियोसिससह (स्पाइनल कॉर्डसंबंधी स्थिती) आयुष्य जगणे तसेच प्रत्येक परिस्थितीत कठोरता आणि दृढ संकल्प करत या सर्व समस्यांना मागे टाकत कशाप्रकारे त्याने पुढे जात यश मिळवले याबाबतची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. ऋतिकला एक प्रेरणा म्हणून सर्वांसमोर आणणे हाच या पुस्तकाचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नुकतंच जखमी झाल्यानंतरही ऋतिकने त्यावर मात करत पुन्हा एकदा नवीन कामाची सुरुवात केली आहे. आपल्या वेगळ्यावेगळ्या चित्रपटांतून सिनेसृष्टीत जबरदस्त कामगिरी करत ऋतिकने प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. सध्या ऋतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट 'सुपर ३०' मध्ये व्यस्त आहे. एका गणितज्ञाच्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३० विद्यार्थांना आयआयटी आणि जेइइच्या परिक्षांसाठी कशाप्रकारे तयार केलं जातं ते या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. 'सुपर ३०' येत्या जुलै २०१९ मध्ये प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. 'सुपर 30' या सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करणार असून या चित्रपटाची कहाणी प्रसिद्ध गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे.