मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) लवकरच नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, त्यांच्या या चित्रपटावरुनच वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेला  Why I Killed Gandhi हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाविरुद्ध जनहित याचिका
‘why i killed gandhi’ या चित्रपटावरवर बंदी आणून त्याचं सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही रद्द करा, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी दाखल करण्यात आली. याचिकाकर्ते विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव, सेन्सॉर बोर्ड आणि निर्मात्याला प्रतिवादी करण्यात आलं आहे. 


अशोककुमार त्यागी दिग्दर्शित ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंसेचं उदात्तीकरण करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बदनामी करणारा आहे. चित्रपटाचा हेतू लोकशाही मूल्यव्यवस्था मोडीत काढण्याचा आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घाला, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.


अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा चित्रपट राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करणारा आहे. त्यातून सामाजिक आणि धार्मिक विद्वेष वाढणार आहे, असं सांगत याचिकाकर्त्याने चित्रपटातील प्रक्षोभक वाक्यं याचिकेत नमूद केली आहेत. 


येत्या ३० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही कलाकृती घटनाबाह्य आणि निकषाच्या बाहेरची आहे. भारत सरकार आणि सेन्सॉर बोर्डाने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही. हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचा गैरवापर असल्याचे याचिकेत म्हटलं आहे.