मुंबई : देशभरात ७३व्या स्वातंत्र्या दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सानथोरांपासून प्रत्येकाचाच उर हा देशाभिमानाने भरुन गेला आहे. सर्वच स्तरांतून १५ ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी सर्वत्र या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. देशाभिमानाची मुहूर्तमेढ स्वातंत्र्यसैनिकांच्या बहुमुल्य योगदानाने आणि इतरही अनेक मार्गांनी रोवली गेली. यामध्ये कलाविश्वाचंही योगदान पाहायला मिळालं. आजवर बऱ्याच चित्रपटांमधून भारताचं गुणगान गायलं गेलं आहे. समर्पक शब्द, सुमधूर चाल आणि त्याला साजेसं दृश्य, कलाकारांचा अभिनय या बळावर चित्रपट गीतांमधून थेट मनाला भिडणाऱ्या भारताचं दर्शन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्षांपासून अशीच काही गाणी सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहेत. ज्यामध्ये नव्या जोमाच्या कलाकारांच्या योगदानाचीही जोड मिळत आहे. तरुणाईचा उत्साह आणि प्रचंड देशाभिमानाची हीच भावना दुपटीने वाढवणारी ती गाणी आहेत... 


तेरी मिट्टी (केसरी) 


आर्को प्रावो मुखर्जीने संगीतबद्ध केलेल्या आणि बी. प्राकने गायलेल्या 'तेरी मिट्टी' या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या 'केसरी' या चित्रपटातील गीताच्या माध्यमातून मातृभूमीच्या सेवेत असणाऱ्या एका सैनिकाच्या मनातील भावनांचं सुरेख चित्रण करण्यात आलं होतं. 



ए वतन (राझी)


ए वतन, वतन मेरे आबाद रहे तू... असे बोल असणारं हे गाणं ऐकून अंगावर काटाच उभा राहतो. गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेले शब्द आणि शंकर-एहसान-लॉय या त्रिकूटाचं संगीत या गाण्याची जमेची बाजू. त्यात पडद्यावर दिसणारे प्रसंग आणि कलाकार आणि त्यांचा अभिनय म्हणजे क्या बात! 



छल्ला (उरी- द सर्जिकल स्ट्राईक) 


भारतीय संरक्षण दलाकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं प्रत्ययकारी चित्रण करण्यात आलेल्या 'उरी...' या चित्रपटातील 'छल्ला' हे गाणं म्हणजे निव्वळ उत्साह.... उत्साह... एका अद्वितीय मोहिमेला वास्तवात उतरवण्याचा विडा उचललेल्या जवानांच्या उत्स्फूर्त भावनांचं आणि त्यांच्या जिद्दीचं या गाण्यातून चित्रण करण्यात आलं आहे. पंजाबी लोकगीताला देशभक्तीपर रुपात साकारण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. 



भारत (मणिकर्णिका) 


देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्यांना सलाम करणारं, 'मणिकर्णिका' या चित्रपटातील हे गीत. एका अद्वितीय आणि राष्ट्रप्रेमाने भारलेल्या स्त्रीचं अर्थाच झाँशीची राणी लक्ष्मीबाई यांचं प्रभावी चित्रण या गाण्यातून करण्यात आलं आहे. ब्रिटींशांची लढा देण्याची त्यांची वृत्ती आणि साहस पाहता हे गाणं ऐकताना नकळत डोळ्याच्या कडा पाणावतात. 



जागा हिंदुस्थान (गोल्ड) 


अमाल मलिक आणि केके यांनी गायलेलं 'जागा हिंदुस्थान' हे गाणं तिरंग्याची शान सर्वांसमक्ष आणतं. जे ऐकताना मान अभिमानाने उंचावते.