सध्याच्या काळात `खान` असणं म्हणजे गुन्हा; दिग्गज कलाकाराकडून मुलांच्या आडनावात मोठा बदल
मुलांच्या नावापुढे हे आडनाव लावूच नये ही किती मोठी शोकांतिका.
मुंबई : काळ कितीही पुढे आलेला असला, आपण कितीही पुरोगामी विचारांची कास धरलेली असली तरीसुद्धा जातीयवाद मात्र कमी झालेला नाही हेच दाहक सत्य. एका दिग्गज कलाकाराला त्याच्या 'खान' या आडनावाची इतकी अडचण वाटावी, की त्यानं मुलांच्या नावापुढे हे आडनाव लावूच नये ही किती मोठी शोकांतिका.
हेच वास्तव आणि समाजाचा आपल्याला आलेला अनुभव ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान (Amjad Ali Khan) यांनी सांगितला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.
मुस्लीम असल्यामुळं त्यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. तेव्हाच आपण नाव बदलून सरोद, असं करावं हा विचार त्यांच्या मनात आला होता. या मुद्द्यावर व्यक्त होत ते म्हणाले, '21 व्या शतकात असं वाटत होतं की सर्वकाही शांत होईल. शिकून लोक समजुतदार होतील असं वाटत होतं. पण, शालेय संस्था व्यावसायिक संस्था झाल्या. म्हणून शिक्षण आपल्याला समजुतदार मन देऊ शकलं नाही. आजसुद्धा धर्म, रंग यांच्या आधारे भेदभाव केला जातो. लोक दया दाखवण्याऐवजी निर्दयी होऊ लागले आहेत.'
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेडसेंटरवर 9/11 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर मुस्लिमांकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला. या घटनेनंतर परदेशात गेलं असता आपण, खान असल्याचं कळताच तपासणी केली जात होती.
यासाठीच जेव्हा आमच्या पत्नीनं मुलगा अमान आणि अयान यांना जन्म दिला तेव्हा आम्ही त्यांच्या नावापुढे पूर्वजांचं बंगश हे आडनाव लावलं. त्यामुळं आता आमच्यासोबत असं होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
खान आडनावामुळं समाजाकडून मिळालेली वागणूक मन हेलावणारी होती, असं म्हणज इतक्या दिग्गज कलाकारानं व्यक्त केलेली खंत पाहता, कुठे चाललीये मानसिकता? हाच प्रश्न विचारावासा वाटतो.