मुंबई : 'उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली' असं म्हणणारे अलार्म काका अर्थात ज्येष्ठ अभिनेते आणि कलावंत विद्याधर करमरकर यांचं सोमवारी निधन झालं. मृत्यूसमयी ते 93 वर्षांचे होते. हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप या कलाविश्वात सोडली. पण, अलार्म काका या नावानं ते जास्त लोकप्रिय झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी कलावर्तुळामध्ये आबा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या करमरकर यांनी अनेक जाहिरातीही साकारल्या. बऱ्याच चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहता आली. 'एक व्हिलन', 'एक थी डायन', 'कार्तिक कॉलिंग कार्तिक', 'लंच बॉक्स' अशा अनेक चित्रपटांतून ते झळकले होते. चरित्रात्मक भूमिका साकारण्यासाठी ते ओळखले जायचे. 



'लेनोवो', 'एशियन पेंट्स', 'हाईंज केचअप', 'इंडियन ऑईल' अशा अनेक प्रथितयश ब्रँडच्या जाहिरातींतूनही या ज्येष्ठ कलावंताचा चेहरा झळकला होता. रुपेरी पडदा आणि जाहिरात विश्वासोबतच रंगभूमीसाठीही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. नोकरी करत त्यांनी अभिनयाची ही आवड जोपासली आणि या कलाजगतामध्ये आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली. दिग्दर्शनातही त्यांनी आपलं नशीब आजमावून पाहिलं. कलेच्या प्रत्येक वर्गातील शिकवणी अनुभवत घडलेल्या या कलावंताला संपूर्ण कलाजगत आणि चाहत्यांच्याविश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.