मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह आनंद पिरामल याच्यासोबत होणार आहे. येत्या १० डिसेंबर रोजी हा विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे. या भव्य विवाह सोहळ्यात इंटरनॅशनल पॉपस्टार बियोन्से परफॉर्म करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डीएनए'नं दिलेल्या माहितीनुसार, ईशा अंबानी ही बियॉन्से हिची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळेच ईशाची इच्छा पूर्ण करत मुकेश अंबानी यांनी बियॉन्से हिला या खास क्षणाला परफॉर्म करण्यासाठी पाचारण केलंय. 


गेल्या महिन्यात आनंद-ईशा यांचा साखरपुड्याचा सोहळा इटलीच्या लेक कोमोमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रियांका चोपडा, सोनम कपूर, शाहरुख खान, करण जोहर यांच्यासोबतच अनेक सिलिब्रिटी दाखल झाले होते. आता बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेता - अभिनेत्रीही विवाह सोहळ्यात दिसणार आहेत.



शाही विवाह सोहळा


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीनं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. ईशानं येलमधून यापूर्वी सायकोलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीज पूर्ण केलीय. तिनं स्टॅनफोर्ड नर्सरीमध्ये आपल्या शिक्षणादरम्यान शिकवण्याचं कामही केलं.


महाबळेश्वरच्या एका मंदिरात आनंदनं ईशाला प्रपोज केलं होतं... आनंद पीरामल हा व्यावसायिक अजय पीरामल यांचा मुलगा आहे. ईशा-आनंदचा विवाह भारतातच होणार आहे.ईशा आणि आनंद एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांचे कुटुंबीय एकमेकांना चार दशकांपासून ओळखतात. 


आनंदनं हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलंय. तो सध्या पीरामल एन्टरप्राईजचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं आपले दोन स्टार्टअप्स सुरू केले होते. पहिलं हेल्थकेअर स्टार्टअप होतं...ज्याचं नाव पीरामल ई स्वास्थ्य असं होतं. तर दुसरं स्टार्टअप पीरामल रिअॅलिटी हे रिअल इस्टेटशी संबंधित होतं. आता दोन्ही पीरामल एन्टरप्राईजचाच एक भाग आहेत.