चैतू आणि चिमीचे दिवाळी सरप्राईज; `नाळ २` मध्ये पुन्हा वाजणार `जाऊ दे नं वं` गाणं?
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित `नाळ` या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील निरागस `चैतू` सर्वांनाच आवडला. आणि विशेष गाजले ते जयस कुमार यांनी गायलेले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे बोल आणि संगीत लाभलेले `जाऊ दे नं वं` हे जबरदस्त गाणं.
मुंबई : २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील निरागस 'चैतू' सर्वांनाच आवडला. आणि विशेष गाजले ते जयस कुमार यांनी गायलेले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे बोल आणि संगीत लाभलेले 'जाऊ दे नं वं' हे जबरदस्त गाणं. आज इतक्या वर्षानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. दिवाळीत 'नाळ भाग २' प्रदर्शित होत असून या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'भिंगोरी' आणि 'डराव डराव' या गाण्यांना प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. यावरून ही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत, हे कळतेय. मात्र लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, 'जाऊ दे नं वं' हे सुपरहिट गाणं या चित्रपटात ऐकायला आणि पाहायला मिळणार का, याची.
नुकताच 'नाळ भाग २'च्या टीमचा चित्रीकरणादरम्यान सुरु असलेल्या पडद्यामागची धमालचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या दरम्यान मागे 'जाऊ दे नं वं' हे गाणे वाजत आहे. त्यामुळे आता हे गाणे चित्रपटात असणार का? याचे उत्तर प्रेक्षकांना १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे. दरम्यान झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २'मध्ये श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'नाळ'मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला 'नाळ भाग २'मध्ये मिळणार आहे.
'नाळ भाग २'चा ट्रेलरही उत्कंठा वाढवणारा आहे. ट्रेलर पाहाता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचं दिसतंय. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात चित्रीकरण स्थळही एक व्यक्तिरेखा साकारत असते. याचा प्रत्यय 'नाळ भाग २'मध्येही येत आहे. ज्याप्रमाणे कलाकार इतक्या ताकदीचे दिसत आहेत, तितकेच चित्रीकरण स्थळही महत्वाची भूमिका बजावत आहे. नदी, दऱ्या, डोंगर, घरे असे निसर्गसौंदर्य चित्रपटात अतिशय सुरेखरित्या टिपण्यात आल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधत आहे ते चिमुकल्या गोंडस चिमीकडे. तिची निरागसता प्रेक्षकांना मोहणारी आहे. ज्याप्रमाणे 'नाळ'हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट होता, तसाच 'नाळ भाग २'ही आहे.