मुंबई : आपल्या देशाला विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, त्याचवेळी सुशिक्षित बेकारांची समस्याची निर्माण झाली आहे. या समस्येवर मनोरंजनाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न "जगा वेगळी अंतयात्रा" या चित्रपटातून करण्यात आलं आहे. हा चित्रपट २३  मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 


डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.ली. या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमोल लहांडे यांनी चित्रपटाचं  लेखन दिग्दर्शन केलं आहे.अभिनेता भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे  या नव्या दमाच्या कलाकारांनी चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत. रोहन रोहन या आजच्या पिढीच्या संगीतकारद्वयीनं चित्रपटाचं संगीत केलं आहे. चित्रपटाचं शीर्षक जरी गंभीर वाटलं, तरी हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. 


इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट असे उच्चशिक्षित असलेल्या चार तरुणांची गोष्ट या चित्रपटात उलगडली आहे. सुशिक्षित बेकारीच्या यक्षप्रश्नावर हे तरूण कशा पद्धतीनं मार्ग काढतात हे विनोदी पद्धतीनं मांडण्यात आला आहे. त्यामुळे एक आगळीवेगळी कथा, त्याची साजेशी मांडणी आणि निखळ मनोरंजन असं सारं काही या चित्रपटात आहे. केवळ मनोरंजनच नाही तर माणुसकी संपत चाललेल्या आजच्या जगात प्रत्येकाला स्वतःचं आत्मचिंतन करायलाही हा चित्रपट भाग पाडतो. केवळ आपल्यापुरता विचार करणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचाही प्रयत्न या निमित्त करण्यात आला आहे.


बऱ्याच दिवसांनी एका चांगल्या कथानकाचा चित्रपट बघितल्याचं समाधान या निमित्तानं सिनेरसिकांना मिळणार आहे.