मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाहसोहळा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला. ज्यानंतर आता मात्र 'देसी गर्ल'चा विवाहसोहळा एका वेगळ्या कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. 'द कट' नावाच्या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या संकेतस्थळावर निक आणि प्रियांकाच्या लग्नावर आक्षेपार्ह भाषेत विधानं करण्यात आली असल्यामुळे जोनास कुटुंबीय आणि चाहत्यांचा रोष या मासिकाने ओढावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकावर थेट शब्दांमध्ये टीका करणारा तो लेख प्रसिद्ध होताच कलाविश्वातून आणि चाहत्यांच्या वर्गातून त्याचा विरोध करण्यात  आला. अनेकांनीच त्याला अर्वाच्च शब्दांतील, वर्णभेदाला प्रेरणा देणारा लेख असंही म्हटलं आहे. 


मारिया स्मिथने लिहिलेल्या या लेखाचा होणारा विरोध पाहता त्यात काही बदल करण्यात आले. पण, एकंदरच बिघडणारी परिस्थिती पाहता हा लेख संकेतस्थळावरुन हटवण्यात आला. 


प्रियांकाचा उल्लेख global scam artist  म्हणून करत तिच्या टीमसह मिळून निकशी लग्न करण्याचा हा बेत आखल्याचं मारियाने त्यात लिहिलं होतं. निक हा त्याच्या मनाविरुद्ध या नात्यात अडकला आहे, असं म्हणत मारियाने या विधानाचं स्पष्टीकरणही लेखात दिलं होतं. 


काय लिहिलेलं त्या लेखात? 


'वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी निकला लग्न करणं फारसं गरजेचं नव्हतं. उलटपक्षी प्रियांकाचं वय मात्र लग्न करण्यायोग्य होतं, असंही या लेखात म्हटलं गेलेलं. हॉलिवूडमध्ये आलेल्या या अभिनेत्रीसोबत अवघे काही दिवस वेळ व्यतीत करण्याचीच त्याची इच्छा होती. पण, या global scam artistमुळे मात्र आता त्याला एक प्रकारची शिक्षाच मिळाली आहे. घोड्याच्या पाठीवर बसून निक विवाहस्थळी आला खरा. पण, प्रियांकाने तो घोड्यावर बसू शकतोय का, हे विचारण्याची तसदीही घेतली नाही', अशा शब्दांमध्ये या लेखातून प्रियांकाला निशाणा करण्यात आलं. 


प्रियांकावर होणारी ही टीका आणि चर्चा पाहता तिच्या सासरच्या मंडळींकडून तिखट शब्दांमध्ये संबंधित मासिकावर ताशेरे ओढण्यात आले. सोफी टर्नर आणि निकचा भाऊ जो जोनास यांनी त्या मासिकाचा विरोध करत असा लेख प्रसिद्ध करण्य़ाला निर्लज्जपणाचं नाव देत संताप व्यक्त केला. 



आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका प्रसिद्ध मासिकातून करण्यात आलेल्या या टीका आणि एकंदरच या प्रकरणाला मिळालेलं वळण पाहता आता निक आणि प्रियांका यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.