मुंबई : अभिनेता इमरान हाशमी आणि जॉन अब्राहम ही जोडी रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाच्या नावासह चित्रपटातील कलाकारांचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गॅंगस्टर्सवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांचीही एन्ट्री झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी एक फोटो शेअर करत चित्रपटाच्या नावाची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. 'मुंबई सागा' असं चित्रपटाचं नाव असून संजय गुप्ता या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. १९८०-९० च्या दशकातील मुंबईत झालेल्या गॅगवॉरबाबतची कहाणी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. 



या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी यांच्या प्रमुख भूमिकेव्यतिरिक्त अनेक बडे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. 'मुंबई सागा'मधून जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोनित रॉय आणि अमोल गुप्ते अशी तगडी स्टारकास्ट एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 



पुढील महिन्यापासून 'मुंबई सागा'चं शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. २०२० मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अनुराधा गुप्ता निर्मीती करणार आहेत.


संजय गुप्ता यांनी 'मुंबई सागा'आधी हृतिक रोशन आणि यामी गौतम स्टारर 'काबिल' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसंच त्यांनी याआधीही गॅंगस्टर्सवर आधारित 'कांटे', 'शूटआउट अॅट वडाला' आणि 'शूटआउट अॅट लोखंडवाला' असे चित्रपट साकारले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता 'मुंबई सागा'ला प्रेक्षकांची कशी पसंती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.