मुंबई : सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात. समाजाच्या भीतीपोटी,शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी  ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच झळकले असून मनवा नाईक, हरीश दुधाडे, भिमराव काशिनाथ मुडे यांनी या सीरिजचे लेखन केले आहे. प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजचे अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक निर्माते आहेत. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती यात कोणते चेहरे झळकणार आहेत याची. 


‘कांड’बद्दल दिग्दर्शक भिमराव काशिनाथ मुडे म्हणतात, ‘’लैंगिक खंडणी हा एक गंभीर विषय आहे. लैंगिक खंडणीला बळी पडलेले अनेकदा लाजेखातर, भीतीमुळे या विषयावर भाष्य करणे टाळतात आणि शेवटी टोकाचा निर्णय घेतात. हे अत्यंत चुकीचे आहे. समाजाला जागरूक करणारी ही वेबसीरिज प्रत्येकाने पाहावी, अशी आहे.'' 



प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' सेक्स्टॅार्शनच्या गुन्ह्यामध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. समाजात होणारी बदनामी, ही खंडणीदाराची मोठी ताकद असते. हीच ताकद मोडून काढायचा प्रयत्न 'कांड'मध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाला बळी पडल्यावर न घाबरता काय  करावे, हे या वेबसीरिजच्या माध्यमातून दाखवून प्रेक्षकांना सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.''