मुंबई: धार्मिक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केलं आहे. नुपूर शर्मा यांनी एका डिबेट शो मध्ये पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्या टीकेची झोड उठली आहे. मुस्लिम समुदायच नाही तर आखाती देश देखील नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याप्रकरणी नाराजी व्यक्त करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकरण चिघळत असल्याचं पाहून नुपूर शर्मा यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच भाजपाने एक निवदेन जारी करत या वक्त्यव्याचा पक्षासी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. मात्र असं असताना अभिनेत्री कंगना रानौत हिनं नुपूर शर्मा यांची पाठराखण केली आहे. नुपूर शर्मा यांना त्यांचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असल्याचं कंगनाने इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आपलं वक्तव्य जारी केलं आहे.


"नुपूरला तिचं मत मांडण्याचा हक्क आहे. तिला देण्यात येणाऱ्या धमक्या मला स्पष्टपणे दिसत आहे. ते लोकं दररोज हिंदू देवांचा अपमान करतात. तर आम्ही कोर्टात जातो. कृपया डॉन बनण्याची गरज नाही. हा अफगाणिस्तान नाही. आमच्या देशात एक सरकार असून लोकशाही प्रक्रियेतून सत्तेत आलं आहे. जे कोणी ही बाब विसरले आहेत, त्यांना आठवण करून देते.", असं कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीत सांगितलं आहे. 


नुकताच कंगनाचा धाकड हा चित्रपट रिलीज झाला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचू शकला नाही. दुसरीकडे कंगनाचे आगामी चित्रपट प्रतीक्षेत आहेत. तेजस, सीता आणि मणिकर्णिका रिटर्न्स या चित्रपटात कंगना दिसणार आहे. तर आगामी चित्रपट इमर्जन्सीचं चित्रीकरण सुरु झालं आहे. या चित्रपटात पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे.