Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौट सध्या चर्चेत आहे. मंगळवारी झालेल्या दसऱ्यानिमित्त दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केले. 50 वर्षांची परंपरा कंगनाने मोडित काढली आहे. पहिल्यांदा एका महिलेने रावणदहन केले आहे. त्यामुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, असे असतानाच या कार्यक्रमातीलच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यामुळंच कंगना पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकीकडे कंगनावर टीका होत असताना तिच्या मदतीसाठी पाकिस्तानचा माजी खेळाडू धावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये कंगना रणौट सहभागी झाली होती. यावेळी तिने रावणदहन केले. याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी कंगनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसतंय की, रावणदहन करण्यासाठी कंगनाने धनुष्यातून बाण सोडला पण तिचा नेम चुकला. हा प्रकार दोनदा घडला. प्रशांत भूषण यांनी हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीवर टीका केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, खूब लडी मर्दानी, वह तो झांसे वाली रानी थी, असं म्हणत कंगनाची खिल्ली उडवली आहे. 


कंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटातील डायलॉग थोडासा बदलून प्रशांत भूषण यांनी तिच्यावर टीका केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावरही कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. कंगनावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने उत्तर दिलं आहे. प्रशांत भूषण यांच्या ट्विटवरच उत्तर देत त्यांने टीकाकारांना सुनावलं आहे. 



दानिश कनेरियाने म्हटलं आहे की, एखाद्याची खिल्ली उडवणं ही खूप सोपी गोष्ट आहे. कमीत कमी कंगनाने तिच्या देशासाठी रील लाइफमध्ये काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि तुम्ही जीवनात काहीच चांगलं करु शकत नाहीत. मणिकर्णिका हा पाहिलाच पाहिजे असा चित्रपट आहे. ज्याने आपल्या सर्वांच्या जीवनात देशभक्ती आणि स्वाभिमानाची भावना पुन्हा जिवंत केली आहे.


दरम्यान, कंगनाला दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. लाल किल्ल्यातील या रामलीलाचा इतिहास तब्बल 50 वर्ष जुना आहे. गेल्या 50 वर्षातील हा पहिलाच प्रसंग आहे जेव्हा एखाद्या महिलेच्या हातून रावणदहन झाले. दानिश कनेरिया यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी पाकिस्तानकडून 61 टेस्ट आणि 18 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दानिश कनेरिया याने 261 टेस्ट आणि 15 वनडे सामन्यात विकेट घेतल्या आहेत. मात्र,2012मध्ये दानिश स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी लावण्यात आली होती.