मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक कथानकांवर आधारित चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. याच चित्रपटांमध्ये आता निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी 'कलंक' या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामागोमाग आता चित्रपटातील कालाकांरांच्या फर्स्ट लूकवरुन पडदा उचलण्यात आला आहे. खुद्द करणनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून 'कलंक'ची झलक सर्वांसमोर आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये एका नौकमध्ये दोन व्यक्ती पाठमोऱ्या बसलेल्या दिसत आहेत. एका तलावात ही नौका असून, चित्रपट लगेचच ऐतिहासिक काळाशी प्रेक्षकांना जोडत आहे. अशा या फोटोचं कॅप्शन लिहित 'कलंक' हा चित्रपट नेमका कोणाचा आहे, हे करणने स्पष्ट केलं आहे. या चित्रपटाचं स्वप्न आपण जवळपास १५ वर्षांपूर्वी पाहिल्याचं त्याने कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. 


'हा एक असा चित्रपट आहे, ज्यावर मी सर्वस्वाने काम केलं आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. एत असं स्वप्न ज्यावर त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काम केलं आहे. हे स्वप्न मी पूर्ण करु शकत नाही. पण, त्या स्वप्नाला एक दिशा मात्र नक्की मिळाली आहे....', असं लिहित त्याने कॅप्शनच्या माध्यमातून 'कलंक'प्रतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



चाळीसच्या दशकात या चित्रपटाचं कथानक फिरतं आणि हळुवार उलगडत जातं याची कल्पना करणने दिली आगे. आलिया भट्ट आणि वरुण धवन हे त्याचे लाडके 'स्टुडण्ट्स....' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकाच चित्रपटातून झळकणार आहेत. त्याशिवाय या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर हे चेहरेही झळकणार आहेत. त्यामुळे १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा 'कलंक' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.