मुंबई : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने टेलिव्हिजन अभिनेता आणि गायक करण ओबेरॉयला एका महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका ज्योतिषी  महिलेने रविवारी पोलिसांत करण ओबेरॉयविरोधात लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार तसेच ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी ६ मे रोजी करणला अटक केली होती. गुरुवारी दुपारी करणला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने करणला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. करणचे वकील दिनेश तिवारी यांनी 'आयएएनएस'शी बोलताना शुक्रवारी सत्र न्यायालयात जामिनासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने केलेल्या तक्रारीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तसेच त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओ दाखवून तो प्रसिद्ध करण्याची धमकी देत महिलेकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. त्यानंतर नारळ पाण्यात काही मिसळून तिचा लैंगिक छळ केल्याचाही आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. ३४ वर्षीय महिलेने २०१६ साली एका डेटिंग अॅपद्वारे त्यांची ओळख झाली असल्याचे सांगितले. 



याप्रकरणी करणच्या मित्र आणि सहकाऱ्यांकडून त्याचा बचाव करण्यात येत आहे. अभिनेत्री पूजा बेदीने 'अशा पिडितांना न्याय देण्यासाठी बनवण्यात आलेल्या कायद्याचा महिलांना जबाबदारी वापर केला पाहिजे' असं तिने म्हटलंय. 'बॅन्ड ऑफ बॉइज'चा माजी सदस्य सुधांशु पांडेनेही करणवर लावण्यात आलेल्या आरोपांवर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे.



करण मॉडेल, गायक आणि अभिनेता असून त्याने 'स्वाभिमान', 'जस्सी जैसी कोई नहीं' आणि 'साया' यासारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. त्याचा २००० साली गाण्याचा ग्रुपही होता. करणच्या या ग्रुपला त्याने 'बॅन्ड ऑफ बॉइज' असं नाव दिलं होतं. सुधांशु पांडे, शेरिन वारघसे, सिद्धार्थ हल्दीपुर आणि चैतन्य भोसले यांच्यासह अनेर गाणी गायली आहेत.