मला राहुल गांधींना डेट करायचं होतं - करिना कपूर
करिनाने मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं.
मुंबई : बॉलिवूड 'बेबो' करिना कपूर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. यशस्वी अभिनेत्रींमध्ये करिना कपूरचं नाव नेहमीच घेतलं जातं. करिना कपूरने २००० साली 'रिफ्यूजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जे.पी.दत्ता दिग्दर्शित 'रिफ्यूजी'मध्ये अभिषेक बच्चन आणि करिना कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर करिना कपूरने सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी सिमी गरेवाल यांनी करिनाला 'तुला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल' असा प्रश्न विचारला होता. त्यावर करिनाने मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं.
सिमी गरेवालच्या या प्रश्नावर करिनाने 'मला माहित नाही मी हे सांगायला हवं की नको पण मला वाटत नाही माझं हे सांगण विवादास्पद ठरेल. पण मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल.' असं तिने म्हटलं होतं. 'मला त्यांना जाणून घ्यायला आवडेल. मी अनेक मासिकांमधून त्यांचे फोटो पाहिले, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यास आवडेल. मला चित्रपटांचा वारसा आहे तर राहुल गांधी यांना राजकीय वारसा आहे. त्यामुळे आमच्यातील संवाद अतिशय चांगला होईल' असं करिनाने सिमी गरेवाल यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं.
दरम्यान, २००९ साली करिनाने राहुल गांधींबाबत दिलेलं विधान मागे घेतलं असल्याचं समोर आलं. 'मी केलेलं हे विधान अतिशय पूर्वीचं आहे. मी हे विधान आमच्या दोघांचीही घराणे प्रसिद्ध असल्याने केलं होतं. एकदिवस मला त्यांचं स्वागत करायलाही आवडेल. ते देशाचे पंतप्रधान झाले तर मला नक्कीच आवडेल परंतु मला त्यांना डेट करायचं नाही' असं करिनाने म्हटलं. करिनाच्या या विधानावर राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं मात्र मजेशीर ठरेल.
गेल्या काही दिवसांपूर्वी करिना कपूरला काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी भोपाळमधून उभे राहण्याविषयी विचारले असल्याची चर्चा होती. मात्र करिनाने यावर सध्या राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसून अभिनयावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं म्हटलंय.