`थ्री इडियट`नंतर या सिनेमासाठी आमिर - करीना पुन्हा एकदा एकत्र!
या सिनेमात करिनाची एन्ट्री झाल्याच्या औपचारिक घोषणेनंतर या सिनेमाचं शुटींग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमासाठी चर्चेत आहे. आता या सिनेमात करीनाचीही एन्ट्री झालीय. करीना या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची घोषणा आमिर खाननं आपल्या वाढदिवशी केली होती. परंतु, अद्याप या सिनेमाचं कास्टिंग ठरत नव्हतं. आता मात्र आमिर-करीना ही 'थ्री एडियट'मध्ये दिसलेली जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
या सिनेमात करिनाची एन्ट्री झाल्याच्या औपचारिक घोषणेनंतर या सिनेमाचं शुटींग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
आमची सहकारी वेबसाईट 'बॉलिवूड लाईफ डॉट कॉम'नं दिलेल्या माहितीनुसार, करीनाही या सिनेमात असावी, अशी आमिरची इच्छा होती. यासंदर्भात त्यानं करीनाला विचारलं असता तिनंही याला होकार दिलाय.
करीना आणि आमिरमधली केमिस्ट्री तर प्रेक्षकांनी 'थ्री इडियट़' या सिनेमात पाहिलीच होती... आता पुन्हा एकदा 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाच्या निमित्तानं ही जोडी एकत्र येतेय.
करीना सध्या 'इंग्लिश मीडियम' या सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनमध्ये आहे. लंडनहून परतल्यानंतर ती एका टीव्ही शोमध्येही दिसणार आहे. त्यामुळे हा टीव्ही शो संपल्यानंतरच ती 'लाल सिंह चड्ढा'चं शुटींग सुरू करू शकेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूड स्टार टॉम हॅक्सच्या 'फॉरेस्ट गॅप' या सिनेमाचा हिंदी रिमेक असेल. या सिनेमानं ऑस्कर अवॉर्डही आपल्या नावावर केलाय. याच सिनेमाचा रिमेक बनवण्यासाठी आमिरही तेवढीच मेहनत घेतोय.