गुजरातमधील पहिल्या कोरोना रुग्णासोबत कार्तिकने साधला संवाद
‘कोकी पुछेगा’सीरिजच्या माध्यमातून कार्तिक कोरोना व्हायरसच्या विळख्यातून सुखरूप बाहेर आलेल्या रुग्णांसोबत संवाद साधताना दिसणार आहे.
मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व सेलिब्रिटी घरीच आपला वेळ व्यतीत करत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. तर बाकी सेलिब्रिटींप्रमाणे अभिनेता कार्तिक आर्यन देखील चाहत्यांच्या संपर्कात आहे. पण चाहत्यांसोबत संपर्क साधण्याचा त्याचा मार्ग जरा हटके आहे. त्याने ‘कोकी पुछेगा’ या नावाने एक सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून तो कोरोना व्हायरसच्या विळख्यातून सुखरूप बाहेर आलेल्या रुग्णांसोबत संवाद साधताना दिसणार आहे.
‘कोकी पुछेगा’ या सीरिजचा पहिलाच भाग नुकताच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. पहिल्याच एपिसोडमध्ये त्याने गुजरातमधील पहिली करोनाग्रस्त सुमिती सिंह हिच्याशी संवाद साधला. संपूर्ण काळजी घेवून देखील सुमितीला कोरोनाची लागण झाली. सुमितीला फिरायला फार आवडतं. तिच्या या आवडीमुळे तिला कोरोना झाला. असं खुद्द सुमितीने या शोमध्ये स्पष्ट केले.
सुमिती फिरण्यासाठी फिनलँडला गेली होती आणि तिथून परतल्यावर तिला करोनाची लागण झाली. त्यानंतर जेव्हा सुमितीला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली तेव्हा तिने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले. एवढचं नाही तर रुग्णालयात देखील ती एकटी गेली. या दरम्यान आलेले अनुभव तिने कार्तिकसोबत शेअर केले आहेत.