मुव्ही रिव्ह्यू : जगण्याचा अर्थ आणि जगणं शिकवणारा ‘कासव’
राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणारा ‘कासव’ हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येण्याला मुहूर्त लागला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा असूनही प्रदर्शनासाठी या सिनेमाला इतकी वाट बघावी लागली हे दुर्दैव.
अमित इंगोले, झी २४ तास, मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणारा ‘कासव’ हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येण्याला मुहूर्त लागला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा असूनही प्रदर्शनासाठी या सिनेमाला इतकी वाट बघावी लागली हे दुर्दैव.
खरंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली. ‘कासव’ असं टायटल असल्याने सिनेमात काय असेल अशीही हुरहुर लागली होती. माझ्या अपेक्षेप्रमाणे सिनेमा फारच वेगळ्या पण आपल्या जगण्याशी निगडीत विषयावर आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि त्यांच्या साथीला असलेले सुनील सुकथनकर यांनी आपला वेगळेपणा याहीच्या सिनेमाच्या माध्यमातून जपला आहे. जीवनाचं रहस्य, जगण्याची कला असे अतिशय महत्वाचे पैलू या सिनेमातून उलगडण्यात आले आहेत. प्रत्येकवेळी मनोरंजनच महत्वाचं नसतं तर जगण्यासंबंधीच्या काही महत्वाच्या गोष्टीही समजून घेणं महत्वाचं असतं. तेच या सिनेमातून शिकता येतं.
‘कासव’बद्दल लिहायला सुरूवात करण्याआधीच हा खुलासा करणं मला अतिशय महत्वाचं वाटतं की, जर मसालेदार सिनेमाची मजा यात शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करणार असाल, तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. कारण ही कलाकृती खूप लक्ष देऊन, डोकं जागेवर ठेवून बघण्याची आहे. हा विषय आपल्या सर्वांना ख-या आयुष्यात कधी ना कधी बघायला मिळतो किंवा अनुभवायला मिळतो. कदाचित केवळ टाईमपास म्हणूण सिनेमा बघणा-यांना हा सिनेमा बोरिंगही वाटू शकतो. त्यामुळे वेगळे, काही सांगू पाहणारे सिनेमे बघण्याची आवड असेल तर हा सिनेमा तुम्हाला अधिक पसंत पडेल.
- कथानक -
मानव नावाचा एक चांगल्या घरातील तरूण...मानव असं त्याचं नाव...तो फार अस्वस्थ आहे. फार डिस्टर्ब आहे. त्याला त्याच्या जगण्याचा अर्थच कळत नाहीये. तो दु:खी आहे. पण त्याला त्या दु:खांची कारणेच माहिती नाहीयेत. त्याने सर्वांसोबत नातं तोडलंय. त्याला एकटेपणा हवाय, त्याला मरण हवंय. पण तेही त्याला मिळत नाहीये. असाच एकदा कुठेतरी निघून जात असताना जानकीला तो दिसतो. आणि जानकी त्याला सोबत कोकणात घेऊन जाते. कोकणात ती एका प्रोजेक्टसाठी आलेली आहे. जानकी ही अमेरिकेतून संसार सोडून भारतात सेटल झालीये. जसं आता मानवला होत आहे, तसंच आधी जानकीला व्हायचं. मानव काहीच बोलत नाही. हळूहळू त्याची नेमकी काय अडचण आहे, हे जानकीच्या लक्षात येतं. आणि ती त्याच्याशी वेळोवेळी संवाद साधते. त्यातून ती त्याच्या मनात सुरू असलेल्या गैरसमजूतीला, गोंधळाला, चुकीच्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करते. महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमीच दुर्लक्षीत राहिलेल्या कासवाच्या जगण्याचे संदर्भ देत ही सगळी कथा उलगडण्यात आलीये.
कसा वाटला सिनेमा?
एकतर या सिनेमात काय असणार? हे जाणून घेण्याची सुरूवातीपासूनच उत्सुकता लागली असते. पण सिनेमा जसजसा पुढे जातो तसतसा तो उमगत जातो. आपणही लक्ष देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतो की, त्यांना काय म्हणायचं आहे? मानवची अडचण काय आहे? जानकी त्याला काय सांगत आहे? याकडे लक्ष द्यायला लागतो. कारण या सिनेमातील डायलॉग्सच्या माध्यमातूनच सिनेमाची कथा पुढे नेली जाते. सरधोपटपणे डायलॉग्समधून डोस देण्याचं काम यात करण्यात आलेलं नाही. व्यक्तींच्या संवादामधून ते सांगण्यात आलंय. काही गोष्टी उलगडून दाखवण्यासाठी जे नाट्यमयतेने संदर्भ वापरण्यात आले आहेत ते फार उत्तम झाले आहेत. कोकणात सिनेमा घडत असल्याने कोकणाचं अधिक सुंदर रूप बघायला मिळतं. कॅमेरावर्क फारच सुंदर झालंय. खूपच साधेपणाने ही कथा मांडण्यात आली आहे. काही ठिकाणी कॉमेडीही मस्त जमून आली आहे. सिनेमा बघून आपणही विचार करायला लागतो. आपले आपले संदर्भ जुळवायला लागतो. इथेच सिनेमाचा विजय होतो.
-दिग्दर्शन-लेखन-
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने याआधीही अनेक अर्थपूर्ण, वेगळ्या धाटणीचे सिनेमे दिले आहेत. भलेही त्यांच्या सिनेमांना मास प्रेक्षक मिळाला नसला तरी त्यांचे सिनेमे हे विषयांच्या आणि त्यांच्या मांडणीच्या बाबतीत फारच काटोकोर असतात. उगाच कोणताही धांगडधिंगा न घालता सोप्या पद्धतीने ही जोडी आपली कथा पडद्यावर रेखाटतात. ‘कासव’ ची मांडणी फारच सुरेख आणि सुरेल झालीये, असेही म्हणता येईल. सुमित्रा भावे यांनीच या सिनेमाची उत्तम कथा, पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. मुळात हा मला हा विषय फार अवघड वाटतो, पण दिग्दर्शकांनी तो फारच सोपा करून समोर आणलाय.
- अभिनय -
इरावती हर्षे यांनी या सिनेमात जानकीची भूमिका साकारली असून त्यांनी ही भूमिका फारच शांतपणे आणि सहजतेने साकारली आहे. यात दुसरी महत्वाची भूमिका आहे ती आलोक राजवाडे याची. आलोकने यात मानवची भूमिका फारच डिटेल्ड साकारली आहे. एक दु:खी, जगण्याचा अर्थ माहित नसलेला, जगण्याला हरलेला, सर्वांपासून दुरावलेला मानव फारच उत्तम साकारला आहे. इरावती हर्षे आणि आलोक या दोघांनीही अनेक सीन्समध्ये डायलॉग ऎवजी हावभावातून खूप काही सांगितलं आहे. यांच्यासोबतच किशोर कदम, मोहन आगाशे, ओंकार घाडी(बालकलाकार), देविका दप्तरदार, संतोष रेडकर या सर्वांनीच आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलाय. यातील एकही भूमिका जास्तीची किंवा निरर्थक नाहीये. प्रत्येक पात्राचं त्या त्या सीनमध्ये तितकंच महत्व आहे.
- सिनेमटोग्राफी -
धनंजय कुलकर्णी यांनी केलेली सिनेमटोग्राफी फारच सुंदर झालीये. कोकण आणि समुद्र किती सुंदर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्या कॅमेरातून कोकण आणि समुद्र अधिक सुंदर दिसला आहे. केवळ सुंदर कोकण आणि सुंदर समुद्र दाखवण्यासाठी हे त्यांनी केलं असेल असं नाही तर प्रत्येक फ्रेमला तितकाच अर्थ आहे.
- एकंदर -
एकंदर काय तर हा सिनेमा आपल्या खूपकाही शिकवून जातो आणि खूप गोष्टींचा विचार करायला भाग पाडतो. अतिशय महत्वाचा आणि आपल्या जगण्याशी निगडीत, आपल्या भावना, विचार यावर यातून भाष्य करण्यात आलंय. इतकंच की हा सिनेमा पाहण्यासाठी आणि तो समजून घेण्यासाठी तुमच्यात पेशेन्स असावे लागतात. वेगळे सिनेमे पाहण्याची आवड असेल तर आवर्जून बघावा. केवळ मनोरंजन आणि मसालेपट आवडणा-यांनी या सिनेमाची वाट धरूच नये.
रेटींग - ४.५